टोलचालकाच्या कार्यालयातून पावणेबारा लाख लंपास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - इमारतीच्या प्लास्टरसाठी बांधलेल्या लाकडी पालकावरून चढून चोरट्यांनी टोलकार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केला. आत घुसून पहिल्या मजल्यावरील कपाटातून अकरा लाख 77 हजारांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. सहा) बन्सीलालनगर येथे पहाटे घडली. विशेषत: सकाळी साडेदहालाच ही रक्कम बॅंकेत भरली जाणार होती. 

औरंगाबाद - इमारतीच्या प्लास्टरसाठी बांधलेल्या लाकडी पालकावरून चढून चोरट्यांनी टोलकार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केला. आत घुसून पहिल्या मजल्यावरील कपाटातून अकरा लाख 77 हजारांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. सहा) बन्सीलालनगर येथे पहाटे घडली. विशेषत: सकाळी साडेदहालाच ही रक्कम बॅंकेत भरली जाणार होती. 

गोविंद अग्रवाल यांच्या कार्यालयात ही चोरी झाली. ग्रॅंट कल्याण कन्स्ट्रक्‍शन नावाने त्यांचा बांधकाम व्यवसाय असून, केटीसंगम इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड या टोल कंपनीचे ते मालक आहेत. बन्सीलालनगर येथेच त्यांचे कार्यालय असून, हाकेच्या अंतरावर त्यांचे निवासस्थान आहे. टोल वसूल झाल्यानंतर ते रक्कम बॅंकेत भरणा करीत होते. शनिवारी (ता. चार) व रविवारी (ता. पाच) दुपारपर्यंत लिंबेजळगाव व खडका (ता. वैजापूर) येथील टोल नाक्‍यावर त्यांनी टोल वसूल केला. सुमारे अकरा लाख 77 हजार रुपये त्यांनी रविवारी दुपारी बन्सीलालनगर येथील कार्यालयात रोखपाल गणेश अग्रवाल यांच्याकडे दिले. गणेश अग्रवाल यांनी रक्कम पहिल्या मजल्यावरील कपाटात ठेवली. रात्री काम आटोपून ते घरी गेले. सोमवारी (ता. सहा) पावणेदहाच्या सुमारास गोविंद अग्रवाल कार्यालयात आले. त्या वेळी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील दरवाजाचा कडीकोयंडा त्यांना तुटलेला दिसला; तसेच आतील कपाटाचे लॉक तुटलेले होते. कपाटातील रक्कमही लांबवलेली होती. कार्यालयात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब वेदांतनगर पोलिस चौकीला कळविली. त्यानंतर पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, निरीक्षक सिद्दिकी, शरद इंगळे पथकासह घटनास्थळी पोचले. त्यांनी स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. श्‍वानपथकाकरवी पोलिसांनी तपास केला; पण श्‍वान जागेवरच घुटमळले. 

असा घडला प्रकार 
चोरट्यांनी शक्‍कल लढवत अग्रवाल यांच्या इमारतीत घुसण्यासाठी बाजूला नव्याने उभारलेल्या मुगदिया यांच्या इमारतीला बांधलेल्या लाकडी पालकावरून चढाई केली. त्यानंतर अग्रवाल यांच्या इमारतीच्या गच्चीवर उड्या टाकून दरवाजा तोडला. पायऱ्यांवरून पहिल्या मजल्यावर पोचत दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. कपाटाचे दार तोडून रक्कम लांबविली व त्याच मार्गाने पसार झाले. 

पाळत ठेवून प्रकार 
रविवारी अग्रवाल यांच्या कार्यालयात रक्‍कम ठेवल्याची बाब चोरट्यांना आधीच माहिती असावी. त्यांनी अन्य पाच खोल्या सोडून ज्या खोलीत रक्कम आहे त्याच खोलीचे दार फोडले. विशेषत: यापूर्वी चोरटे कार्यालयात आले असावेत, अन्य दिवशी त्यांनी चोरीचा दिवस निवडला नसून रविवारच निवडला. 

पोलिसांच्या गस्तीला सुरुंग 
बन्सीलालनगर भागात धनाढ्य लोक राहतात. पाच वर्षांनंतर पहिल्यांदा येथे चोरी झाली. या भागात रविवारी वीज बंद होती. त्याचा चोरांना फायदा झाला. येथे विविध बंगल्यांना सुरक्षारक्षक असून पोलिसांची, चार्लीची नियमित गस्त असते; पण चोरी झाल्याने गस्तीलाच सुरुंग लागला असून, येथील नागरिकांनी चोरांचा धसका घेतला आहे.

Web Title: theft in aurangabad