महालक्ष्मीच्या दागिन्यांवरही मायलेकींचा डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

औरंगाबाद - तेरा तोळे दागिने चोरीचा प्रकार सोमवारी (20) उघड झाल्यानंतर याच मायलेकींनी अरिहंतनगर भागातील एका महिला वकील व ओळखीच्या घरातून नोटा व दागिने लांबविले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. त्यानुसार मायलेकींवर दुसऱ्या गुन्ह्याची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 21) झाली. 

औरंगाबाद - तेरा तोळे दागिने चोरीचा प्रकार सोमवारी (20) उघड झाल्यानंतर याच मायलेकींनी अरिहंतनगर भागातील एका महिला वकील व ओळखीच्या घरातून नोटा व दागिने लांबविले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. त्यानुसार मायलेकींवर दुसऱ्या गुन्ह्याची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 21) झाली. 

अरिहंतनगर भागात अनेक दिवसांपासून संगीता व विजया चांडक राहतात. वडील बांधकाम कंत्राटदार असल्याचे विजया सांगते. आपण एका नामांकित महाविद्यालयात बीबीएचे (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) शिक्षण घेत असल्याची माहिती तिने पोलिसांना सांगितली. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे असून, यासाठी नुकतेच पंधरा हजार रुपये शुल्क भरल्याचे ती सांगते. पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, विजया व संगीता यांचा अरिहंतनगर भागात शेजाऱ्यांशी चांगला परिचय आहे. ओळखीचा फायदा घेत त्या घरात घुसतात व दिसेल त्या वस्तू लांबवतात. अरिहंतनगर भागातील मीराबाई उघडे यांनी सणानिमित्त महालक्ष्मीची प्रतिस्थापना केली होती. या वेळी उघडे यांनी विजया व तिच्या आईला घरी बोलावले होते. ही संधी साधून विजयाने महालक्ष्मीच्या हातातील व गळ्यातील 96 हजारांचे दागिनेही लांबविले. ही बाब उघड झाल्यानंतर उघडे कुटुंबीयांनी दागिन्यांची मागणी केली; पण पोलिसांत तक्रार देण्याचे त्यांनी टाळले होते. त्यावेळी मायलेकींनी दागिने दिले नाही; पण जैस्वाल यांच्या घरातील प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनीही आपल्यासोबत झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. या प्रकरणात दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. नोटाबंदीच्या काळात एका महिला वकिलाच्या घरात ओळखीचा फायदा घेत त्या घुसल्या. त्यांची पन्नास हजारांची रक्कम व सोन्याची अंगठीही मायलेकींनी चोरी केली होती; पण या प्रकरणात महिला वकिलांकडून तक्रार देण्यात आली नव्हती. 

उलट्या बोंबा 
मायलेकींना पोलिसांनी मंगळवारी (ता. 21) सकाळी राहत्या घरातून अटक केली. त्या वेळी आम्हाला बदनाम करता का, आम्ही तुम्हाला चोर वाटलो का, अशा उलट्या बोंबा संगीता चांडक हिने मारल्या. अशी माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली. 

Web Title: theft in aurangabad