दोन दिवसांत अर्धा डझन घरफोड्या

Theft
Theft

औरंगाबाद - शहरात घरफोड्या वाढल्या आहेत. यामुळे नागरिक जेरीस आले असून, दोन दिवसांत शहरात तब्बल अर्धा डझन घरफोड्या झाल्या. त्यामुळे नागरिक दहशहतीत असून, पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज आहे. 

शहरात नवीन पोलिस आयुक्त रुजू झाल्यानंतर गुन्ह्यांवर अंकुश बसेल अशी आशा होती; मात्र घरफोड्यांचा आलेख वाढताना दिसून येत आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात दरदिवशी छोट्या-मोठ्या दोन घरफोड्या होतात.

महिन्याकाठी सुमारे बावीस ते पंचवीस घरफोड्या होतात. ही बाब गंभीर असतानाच दोनच दिवसांत सहा घरफोड्या झाल्या. पोलिसांच्या पोकळ गस्तीचा हा परिणाम असून, गस्तीला सुस्तच आल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. चोख गस्त व घरफोडी रोखण्यासाठी ठोस उपायांच्या अभावामुळे अशा घटना वाढत आहेत. विशेषत: या चोऱ्यांचे उकल होण्याचे प्रमाणही कमालीचे अत्यल्प असल्याने स्थिती जास्त गंभीर आहे.

अशा घडल्या घटना
१.  पदमपुरा (३० जून) - नवयुग कॉलनीत रमन रामानुज रांदड यांचे चोरांनी रात्रीतून घर फोडले. रोख ९२ हजार, ३ लाख ३४ हजारांचे दागिने असा एकूण ४ लाख २६ हजारांची लूट चोरांनी केली.

२.  हडको एन-११ (३० जून) - सुभाषचंद्र बोसनगर हडको एन-११ येथे भारतकुमार शांतिनाथ डोंगरे यांच्या घरी चोरांनी सकाळी दहानंतर बनावट चावीच्या साह्याने घरफोडी केली. डोंगरे यांची २५ हजारांची दुचाकी, रोख दोन हजार रुपये व तीन हजारांच्या चांदीच्या वस्तू असा ३० हजारांचा ऐवज पळविला.

३.  सिडको एन-आठ (२९ जून) - शेख मोसीन अब्दुल कादर यांचे श्रद्धा टी हाउस चोरांनी रात्रीतून फोडले. रोख दोन हजार रुपये व एकूण ४० हजारांचा माल लंपास केला. 

४.  सुराणानगर (२९ जून) - सतीश लिंबराज विश्‍वेकर यांचे रात्रीतून घर फोडून चोरांनी तीन हजार चारशे रुपयांचा ऐवज पळविला. 

५.  खोकडपुरा (२९ जून) - खोकडपुऱ्यातील सतीश सावरगावकर यांचे घर फोडून रोख ५८ हजार, चाळीस हजारांचे दागिने असा ९८ हजारांचा ऐवज लंपास केला. 

६.  बालाजीनगर (२९ जून) - विशाल शालिग्राम दुंदुले यांचे घर फोडून रोख १५ हजारांसह नव्वद हजारांचा ऐवज लंपास केला.

सिल्कमिल कॉलनीत सात लाखांची घरफोडी
सिल्कमिल कॉलनीत शासकीय कंत्राटदाराचे घर फोडून चोरांनी तब्बल बावीस तोळे सोने व रोख एक लाख पंधरा हजार रुपये असा जवळपास सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (ता. एक) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. 

शासकीय ठेकेदार प्रशांत बाबासाहेब कोळसे (वय ३२, रा. अमृत साई प्लाझा, सिल्कमिल कॉलनी) यांचा अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. नगर जिल्ह्यातील भेंडाळा येथे आईवडिलांना भेटण्यासाठी ते शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास घरातून निघाले. तत्पूर्वी कोळसे दांपत्याने फ्लॅटच्या लोखंडी व लाकडी दरवाजाला कुलूप लावले. चोरांनी कुलूप तोडून घरातील सोने व रक्कम लंपास केली. रविवारी दुपारी कोळसे दांपत्य घरी परतले. त्यावेळी चोरी झाल्याची बाब स्पष्ट झाली. या घटनेची माहिती समजताच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ज्ञांसह श्‍वानही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. मित्राला उसने दिलेले पैसे त्याने गत आठवड्यात परत केले होते. ही रक्कम कोळसे म्हाडाच्या टेंडरसाठी वापरणार होते; परंतु त्याआधीच चोरांनी हात दाखवत एक लाख पंधरा हजार लंपास केले.

या दागिन्यांची चोरी 
चार तोळ्यांचा राणीहार, तीन तोळ्यांच्या दोन साखळी, गंठण, पाच ग्रॅमचे झुंबर, पाच अंगठ्या, तीन तोळ्यांचे लॉकेट, दोन ग्रॅमची नथ, एक तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची अंगठी, पाच ग्रॅमची साखळी, वाळ्या, झुंबराचे जोड, वेल, चार ग्रॅमची पोत आदी बावीस तोळे सोने चोरांनी लंपास केली.

चांदीकडे दुर्लक्ष
कोळसे यांच्या कपाटाच्या ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने व रोकड चोरांनी लांबविली. त्यावेळी तिथेच चांदीचे दागिने व कॅमेरा होता; परंतु एवढे मोठे घबाड हाती लागल्याने त्यांनी चांदी व कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com