उद्योजकाच्या घरी चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

औरंगाबाद - पर्यटनासाठी गेलेल्या उद्योजकाच्या घरातून चोरांनी २७ तोळे सोने, डायमंड, प्लॅटिनमचे दागिने व अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी (ता. नऊ) रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. 

औरंगाबाद - पर्यटनासाठी गेलेल्या उद्योजकाच्या घरातून चोरांनी २७ तोळे सोने, डायमंड, प्लॅटिनमचे दागिने व अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी (ता. नऊ) रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. 

संजय कोंडिबा नागरे (रा. सिडको एन-तीन) असे उद्योजकाचे नाव आहे. पाच मे रोजी ते कुटुंबीयांसोबत पर्यटनासाठी महाबळेश्‍वर व अन्य ठिकाणी गेले. दरम्यान, चोरांनी नागरे यांच्या घराच्या मागील बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडले. त्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून त्यांनी रोख अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली. शिवाय पोत, अंगठ्या असे सुमारे २७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व घरातील प्लॅटिनम व डायमंडची आभूषणे त्यांनी लंपास करून आल्या मार्गाने ते पसार झाले. श्री. नागरे व त्यांचे कुटुंबीय नऊ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी पोचले. घराचे गेट व समोरील कुलूप जशास तसे होते; परंतु मागील ग्रील तोडल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला.

दरम्यान, श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांसह पोलिस पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.  

ठसे मिळाले...
ठसेतज्ज्ञांनी घरात पाहणी केली असता, चोरांच्या बोटांचे ठसे तसेच काही बाबी तज्ज्ञांना दिसून आल्या. ठसे व पुरावे गोळा केल्यानंतर श्‍वानांनी चोरांचा माग काढला; परंतु ते घरातच घुटमळले. ग्रील तोडलेल्या ठिकाणी श्‍वानांना पाठवले गेले नाही.

घरफोडीचे सत्र सुरूच
शहरात विविध ठिकाणी दरदिवशी एक-दोन घरफोड्या होतच असून, चोख पोलिस गस्तीचा अभाव दिसून येत आहे. पोकळ गस्तीचा चोरांना फायदा होत असून, ते पोलिसांना दरदिवशी आव्हान देत आहेत. घरफोडीच्या वाढत्या घटनांवर अंकुश लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

Web Title: theft in Businessman Home crime