चोरट्यांनी शंभर किलोची तिजोरी पळविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

शटर उघडून चोरट्यांनी शाखेमध्ये प्रवेश करीत शंभर किलो वजनाच्या तिजोरीसह सात हजार रुपये किमतीचा डीव्हीआर घेऊन पोबारा केला. या तिजोरीची किंमत अंदाजे 75 हजार रुपये असून त्यात 1 लाख 20 हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख दोन हजारांचा ऐवज होता

धामणगाव  - तालुक्‍यातील धामणगाव येथील महेश मल्टिस्टेट पतसंस्थेच्या शाखेच्या शटरची पट्टी तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी तिजोरीसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी बॅंकेच्या शाखेतील शंभर किलो वजनाची तिजोरीही उचलून नेली आहे. ही घटना शनिवारी (ता. सहा) दुपारी तीन ते रविवारी (ता. सात) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धामणगाव येथील महेश मल्टिस्टेट को-आपरेटिव्ह पतसंस्थेच्या शाखेतील कर्मचारी शनिवारी (ता. सहा) अर्धा दिवस कामकाज उरकून घरी निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी बॅंकेच्या शटरचे कुलूप न तोडता पट्टी तोडून शटर उघडले व आत प्रवेश केला. त्यामुळे वरून कुलूप लागलेले दिसत असल्याने चोरी झाल्याचे लवकर लक्षात आले नाही. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना चोरी झाल्याचे प्रथम लक्षात आले.

शटर उघडून चोरट्यांनी शाखेमध्ये प्रवेश करीत शंभर किलो वजनाच्या तिजोरीसह सात हजार रुपये किमतीचा डीव्हीआर घेऊन पोबारा केला. या तिजोरीची किंमत अंदाजे 75 हजार रुपये असून त्यात 1 लाख 20 हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख दोन हजारांचा ऐवज होता, तोदेखील चोरट्यांनी लंपास केला. सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्ड असणारा "डीव्हीआर'च चोरट्यांनी नेल्याने तपास करणे पोलिसांना अवघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी पतसंस्थेचे कर्मचारी संतोष कन्हेरकर यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिसांत चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस हवालदार मधुकर कंठाळे हे पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Theft in Dhamangaon