जिल्हा बॅंक शाखेतील सोळा लाख पळविले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

ढोकीतील प्रकार ः गॅसकटरने फोडली तिजोरी 

ढोकी (जि. उस्मानाबाद) ः उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ढोकी शाखेचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने तिजोरी तोडली. या तिजोरीतील 16 लाख 17 हजार 491 रुपये लंपास केले. शनिवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

जिल्हा बॅंकेची येथील मुख्य वेशीजवळ शाखा आहे. खरीप पीकविम्यापोटी वाटपासाठी 16 लाख 17 हजार 491 रुपये तिजोरीत ठेवलेले होते. नेहमीप्रमाणे कामकाज संपल्यानंतर शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी शाखा बंद करून शाखाव्यवस्थापक बाळासाहेब खांडेकर व कर्मचारी घरी गेले. रात्री उशिरा चोरट्यांनी शाखेचा मागील दरवाजा तोडला. गॅस सिलिंडर आत नेला. गॅसकटरने तिजोरी फोडली. त्यातील 16 लाख 17 हजार 491 रुपये लंपास केले. आज सकाळी दहाला शाखा उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उस्मानाबादहून दुपारी तीनला श्वानपथक आले. त्याने चोरटे कुठुून पसार झाले, याचा माग दाखविला. 
पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव व त्यांचे सहकारी जाब जबाब नोंदणीचे काम उशिरापर्यंत करीत होते.

बॅंकेच्या या शाखेत मंगळवारपासून रक्कम पडून होती, असे सांगण्यात येते. पीकविम्यासाठी शेतकरी चकरा मारत असताना शाखेने वाटप का केले नाहीत? यापूर्वीही चोरीच्या घटना घडलेल्या असतानाही एवढी रक्कम ठेवण्याची काय गरज होती, असा सवाल तेथे जमलेल्यांमधून केला जात होता. दरम्यान, येथे वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. 29) ढोकीतील ग्रामस्थ, व्यापाऱ्यांची बैठक सोसायटीच्या गोडाऊनमध्ये सकाळी नऊला बोलाविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in District Bank