सुटीमध्ये चोरट्यांची दिवाळी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - दिवाळी सुटीमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी विविध ठिकाणी चोरी, घरफोड्यांचा सपाटाच लावला. तीन ठिकाणी घरे फोडून चोरांनी दीड लाखाचा ऐवज लांबविला. या घटना गुरुवारी (ता. तीन) उघड झाल्या.

औरंगाबाद - दिवाळी सुटीमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी विविध ठिकाणी चोरी, घरफोड्यांचा सपाटाच लावला. तीन ठिकाणी घरे फोडून चोरांनी दीड लाखाचा ऐवज लांबविला. या घटना गुरुवारी (ता. तीन) उघड झाल्या.

मुरलीधर रावसाहेब खरात (रा. रेल्वेगेट, मुकुंदनगर) हे घराला कुलूप लावून धुळे येथे सासुरवाडीला गेले. त्यानंतर चोरांनी त्यांचे घर फोडून आत प्रवेश केला. दहा तोळे चांदी, गॅस सिलिंडर, शेगडी, एलईडी टीव्ही असे साहित्य लांबविले. खरात घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. त्यांनी या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्ह्याची नोंद झाली. दुसरी घटना सिडको भागात घडली. येथील मुंजाजी उत्तमराव पोपळे (रा. सिडको, एन- आठ) हे दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून 31 ऑक्‍टोबरला देवदर्शनासाठी गेले. त्यानंतर चोरांनी त्यांच्या घरातील दागिने व इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू असे 26 हजारांचे साहित्य लांबविले. पोपळे यांचे शेजारी संजय भोसले यांना चोरी झाल्याची बाब समजताच त्यांनी पोपळे यांना माहिती दिली. त्यानंतर पोपळे यांनी घरी येत पाहणी केली असता, 54 हजारांचा ऐवज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या तक्रारीनुसार, सिडको पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. तिसरी घटना हर्सूल भागात घडली. कपिल श्‍यामराव हांडे हे मयूर पार्क भागात राहतात. त्यांची आई घराला कुलूप लावून रुग्णालयात गेल्या. त्या घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचा हार, अंगठी, चांदीची नाणी असा एकूण 75 हजारांचा ऐवज लांबविला. हांडे यांच्या तक्रारीनुसार, हर्सूल पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Theft in Diwali holidays