पंजाब ॲण्ड सिंध बँक चोरट्यांनी फोडली; सुरक्षा रक्षकाची बंदूक पळविली 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

सायंकाळी नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांनी बँकेमध्ये आपली बंदूक जमा करून निघून गेला. परंतु रात्री अज्ञात चोरट्यांनी मागच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरी असलेल्या कक्षात जावून त्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न असफल राहिला.

नांदेड : येथील पंजाब ॲण्ड सिंध बँक अज्ञात चोरट्यांनी मागचे शटर तोडून फोडली. चोरट्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. परंतु सुरक्षा रक्षकाची बंदुक घेऊन त्याने पळ काढला. ही घटना गुरूवारी (ता. 16) पहाटे एकच्या सुमारास घडली. पुन्हा एकदा बँक सुरक्षेचा विषय एेरणीवर आला आहे. 

पोलिस सुत्रांनी देिलेल्या माहितीवरून महाविर चौक परिसरात गुरू तेग बहादूरसिंग मार्केट मध्ये पंजाब ॲण्ड सिंध बँक आहे. स्वातंत्र्य दिनाचा ध्वज फडकावून बँकेचे अधिकारी व कर्मचारी सुटी असल्याने निघून गेले. या बँकेला दिवसा बंदूकधारी माजी सैनिक असलेला सुरक्षा रक्षक असतो. सायंकाळी नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांनी बँकेमध्ये आपली बंदूक जमा करून निघून गेला. परंतु रात्री अज्ञात चोरट्यांनी मागच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरी असलेल्या कक्षात जावून त्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न असफल राहिला. संतप्त चोरट्याने लॉकरच्या बाजूला असलेली सुरक्षा रक्षकाची बंदूक पळविली. तिजोरी फुटली असती तर जवळपास दहा लाखाची रक्कम गेली असती असे बँकेचे शाखा प्रमुख राजेश मौर्य यांनी सांगितले. गुरूवारी सकाळी 10 वाजता हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच वजिराबाद पोलिस निरीक्षक संदीप शिवले, फौजदार अमोल कडू, किरण पठारे यांनी भेट दिली. यावेळी पोलिसांचे श्‍वानपथक व अंगुली मुद्रा तज्ज्ञ यांनीही तपासणी केली. बँकेच्या फुटेजमध्ये एकच चोरटा दिसत असून त्याचा शोध घेणे सुरू झाले आहे. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू होती. 

 

Web Title: Theft at Punjab and Sind Bank