बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड

मनोज साखरे
Tuesday, 19 November 2019

शहरात कुठेही खुट्ट वाजले, तरी धावून येणाऱ्या शिवसेनेला आपल्याच कार्यालयात चोरी झाल्याचा पत्ता लागला नाही. किती दिवस? तर चक्क सात महिने.

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात आहे शिवसेना भवन. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या कार्यालयाला कुलुप लागले आणि तिकडे एकही शिवसैनिक फिरकला नाही. याच शिवसेना भवनात चोरी झाल्याचे उघडकीस आले आणि शहरात एकच खळबळ उडाली.  

शहरातील गजबजलेल्या औरंगपुरा भागातील शिवसेना भवनाच्या इमारतीत चोरी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. अनेक परवानगीच्या पेचात अडकलेल्या व अधिकृत उद्‌घाटन न झालेल्या या शिवसेनेच्या कार्यालयाचा कडी कोयंडा चोडून चोरांनी एक लाख साठ हजारांचा ऐवज लंपास केला. श्री शिवाई सेवा ट्रस्टच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या या कार्यालयातील चोरीबाबत डॉ. मोहन दिनकरराव जोशी (रा. समर्थनगर) यांनी सोमवारी (ता. १८) क्रांतीचौक ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 

सगळंच नेलं लुटून...  

शहरात कुठेही खुट्ट वाजले, तरी धावून येणाऱ्या शिवसेनेला आपल्याच कार्यालयात चोरी झाल्याचा पत्ता लागला नाही. किती दिवस? तर चक्क सात महिने. २४ मे ते १६ नोव्हेंबर या सात महिन्यांच्या काळात केव्हातरी ही चोरी झाली. कडी-कोयंडा तोडून चोरांनी ३५ हजार रुपयांचा एलईडी टीव्ही, सॅटलाईट रिसीव्हर, युपीएस ऍम्प्लीफायर, फ्रेम, टेबलाचे ड्राॅवर्स, कुलुप, नळाच्या तोट्या, केबल आदी साहीत्य लंपास केले. विशेष बाब म्हणजे 1999 ते 2004 व 2009 ते 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभेचा निवडणूक कार्यालयातील पत्रे, हिशोब, प्रचार साहित्याचे नमुने, नामनिर्देशन पत्राची सत्यप्रत, निवडणूक निकालाची सर्व आकडेवारी, विविध विभागांचे करारनामे व परवानगीची कागदपत्रे लंपास झाली.

कसा झाला उलगडा?

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे आराध्य दैवत. त्यांचे या शहरावर विशेष प्रेम होते. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या घोषणेपासून इथे कट्टर शिवसैनिकांची फौज उभी करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. त्याच बाळासाहेबांचा १७ नोव्हेंबरला स्मृतिदिन होता. तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा फोटो आणायला गेलेल्या शिवसैनिकाला कडीकोयंडा तुटल्याचे दिसून आले. चोरीचा उलगडा होत गेल्यानंतर मोहन जोशी यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर क्रांतीचौक पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परिसरात त्या काळात कुणाचा राबता होता याची चाचपणी केली जात आहे. तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिस गोळा करीत आहेत. या वस्तु कुणी लांबविल्या, निवडणुकीबाबतच्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे किंवा परवानगी नामनिर्देशन पत्राची चोरी कुणी केली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Image result for shiv sena bhavan
मुंबईचे शिवसेना भवन

मुंबईनंतरचे मोठे सेना भवन 

श्री शिवाई सेवा ट्रस्ट ही शिवसेनेची अधिकृत संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सेना भवनाचे काम पाहिले जाते. शिवसेनेचे शहरातील 
मुख्य कार्यालय याच ट्रस्टअंतर्गत चालवले जाते. मुंबईच्या सेनाभवनानंतर राज्यातील सर्वात मोठे व भव्य कार्यालय म्हणून औरंगाबादेतील शिवसेना भवनाकडे पाहीले जाते. पण परवानग्यांच्या पेचात अडकलेले हे कार्यालय कुलुपबंद असून, कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेले आहे. याच अडगळीत बाळासाहेबांचा फोटो ठेवलेला होता. तो आणण्याच्या निमित्ताने चोरी उघड झाली. नसता आणखी किती काळ या चोरीचा पत्ता लागला नसता, हा प्रस्नच आहे. 

निवडणुकीतील पराभवानंतर कुणीच फिरकले नाही

लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. तेव्हापासून या कार्यालयात कोणीही फिरकले नाही. यावर चोरट्याने पाळत ठेवलेली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. औरंगाबादच्या शिवसेना भवनात चोरी झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. शहरात सत्ता असलेल्या शिवसेनेच्याच कार्यालयात चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा ः लातुरातलं रक्त संपलं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in Shivsena Bhavan Aurangabad