धावत्या बसमधून पळवले तीन लाखाचे दागिने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पुण्याहून लातूरला येणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन लाख रुपयांचे (12 तोळे) सोन्याचे दागिने आणि रोख 90 हजार रुपये चोरट्याने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. 

लातूर - आजारी आजीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासगी बसने पुण्याहून लातूरला येणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन लाख रुपयांचे (12 तोळे) सोन्याचे दागिने
आणि रोख 90 हजार रुपये चोरट्याने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधीत महिलेने आणि तिच्या वडिलांनी बस पोलिस स्टेशनमध्ये उभी करायला लावली. प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली; पण त्याआधीच चोर पसार झाल्याचे निदर्शनास आले.

बालाजी वैजनाथ चिडबुले (वय 60, रा. बसवेश्वर कॉलनी, परळी) हे आपल्या पुण्यातील मुलीसह राधीका ट्रॅव्हल्सने (एमएच 18 एए 9763) लातूरला येत होते. पुण्यातून शनिवारी (ता. 20) रात्री साडेआठ वाजता बस निघाली. बस पुण्याबाहेर पडल्यानंतर चिडबुले यांना झोप लागली. काही वेळाने मुलीलाही झोप लागली. वाटेत त्यांना एक-दोन वेळा जागही आली.

सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बस लातूरमध्ये आली. पाण्याची टाकी परिसरात त्यांना उतरायचे होते. म्हणून बॅगाची आवराआवर करायला त्यांनी सुरवात केली. तेव्हा पर्स उघडी असल्याचे दिसले. त्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. त्यामुळे चिडबुले यांनी बस थेट एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये थांबवायला सांगितली. त्यानूसार चालकाने बस पोलिस स्टेशनमध्ये नेली. पोलिसांनी सर्व प्रवाशांची झाडाझडती घेतली.
बसचीही पाहणी केली; पण हाती काहीही सापडले नाही. ही बस लातूरच्या आधी बार्शी आणि मुरूडमध्ये थांबली होती. बसमधील प्रवासी तेथे उतरले होते. त्यामुळे पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची यादी घेऊन चौकशी करायला सुरवात केली आहे. ही घटना रविवारी (ता. 21) पहाटे घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of three lakh jewelry in the bus