"साई बॅरेजेस'चे पाणी चालले शेतीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष 

लातूर- शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सप्टेंबरपासून महिन्यातून केवळ दोनच वेळा नळाला पाणी येणार आहे. पावसाने पाठ फिरविल्याने येत्या काही महिन्यांत टंचाईच्या झळा अधिकच बसणार आहेत. अशा परिस्थितीत पडलेल्या पावसाचे पाणी पिण्यासाठी कसे वापरता येईल यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. तरी देखील गेल्या काही दिवसांत साठलेले साई बॅरेजेसचे पाणी शेतीला दिले जात आहे. विद्युत मोटारी टाकून या पाण्याचा सर्रास उपसा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही या प्रकाराकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेसोबत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या शहराला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. सप्टेंबरपासून पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानंतर टॅंकरनेच शहराला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे येथील मांजरा नदीवरील साई बॅरेजेसमध्ये दीड ते दोन फूट पाणी आले आहे.

याच ठिकाणी महापालिकेची एक पाणी योजना आहे. येथील पाणी आर्वीच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणून तेथून अंबाजोगाई रस्त्यावरील भागात त्याचा पाणीपुरवठा करता येऊ शकतो; पण सध्या आलेल्या नदीच्या पात्रातील पाणी हे महापालिकेच्या योजनेच्या विहिरीच्या पाइपपर्यंत न आल्याने त्याचा उपसा करता येत नाही. हे खरे असले तरी सध्या नदीच्या पात्रात आलेल्या पाण्याचा उपसा होता कामा नये.
 

येत्या काही दिवसांत एकदा मोठा पाऊस झाला तर या पाण्याचा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा होऊ शकतो; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सध्या या बॅरेजेसच्या परिसरात मोटारी टाकून पाण्याचा शेतीसाठी सर्रास उपसा सुरू आहे. असाच उपसा सुरू राहिला तर हे नदीचे पात्र येत्या काही दिवसांत कोरडे पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात असलेल्या इनटेक विहिरीतील घाण पाणी तसेच गाळ काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे; पण पात्रात पाणीच राहिले नाही तर या विहिरीत पाणी कसे येणार हा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. 

साई आणि नागझरी येथून शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो. पहिल्या काही पावसांतच या दोन्ही ठिकाणी पाणी येते. येथून पाणीपुरवठा करण्यासाठी योजना दुरुस्ती करून ती तयार ठेवावी असे पत्र मेमध्येच दिले आहे; पण त्याकडे प्रशासन दुर्लक्ष केले जात आहे. आता साई बॅरेजेसमध्ये पाणी आले आहे. त्याचा शेतीसाठी वापर केला जात आहे. लातूरकरांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. 
राजा मणियार, नगरसेवक, बहुजन वंचित आघाडी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of water in sai barrage