कळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात 

संजय कापसे
Thursday, 28 January 2021

तत्कालीन गटविकास अधिकारी यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने बुधवार ( ता. २७ )  गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांना ताब्यात घेतले आहे.

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने बुधवार ( ता. २७ )  गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत कळमनुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. येथील पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी डी. एस. शिंदे यांनी जुलै २० मध्ये तालुका अंतर्गत एका ग्रामपंचायतीमधील स्वच्छ भारत मिशन योजनेमधील स्वच्छतागृहाच्या बांधकामाच्या शिल्लक राहिलेली अग्रिम रक्कम काढून देण्यासाठी संबंधितांकडे सात हजार रुपयांची मागणी केली होती याप्रकरणी संबंधित पदाधिकारी नागरिकांनी या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात सहाय्यक लेखाधिकारी श्री. शिंदे यांना पंचायत समिती कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहात पकडून यासंदर्भात गुन्हा दाखल करून चौकशी चालवली होती.

हेही वाचापोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे

या चौकशी दरम्यान लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने श्री. खिलारी यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवले होते. घटनेनंतर गटविकास अधिकारी श्री. खिल्लारी यांची कळमनुरी येथून बदली झाली होती मात्र नव्याने मिळालेल्या पदस्थापना ठिकाणी ते रुजू झाले नव्हते लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी  पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख,  पोलीस निरीक्षक ममता अफुने, कर्मचारी विजय उपरे, ज्ञानेश्वर पंचलिंगे ,महारुद्र कबाडे, विनोद देशमुख, तानाजी मुंडे, प्रमोद थोरात, यांचा सहभाग असलेल्या पथकाने मनोहर खिल्लारी यांना वाशिम येथून ताब्यात घेतले आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The then Group Development Officer of Kalamanuri was taken into custody by the Bribery Prevention Department hingoli news