सायबर लव्ह नव्हे; "हनी ट्रॅप'! 

सायबर लव्ह नव्हे; "हनी ट्रॅप'! 

औरंगाबाद - विज्ञान संस्था, सैन्यदल, दुतावासामध्ये हेरगिरीसाठी "हनी ट्रॅप' केला जातो; पण आता ही मोडस अगदी सामान्यांसोबतही होत आहे. "हनी ट्रॅप'मध्ये अडकवून युजर्स तरुणांचे आर्थिक व तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत आहेत. एक चूक अंगलट आल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने अशा ट्रॅपपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सोशल मीडियाचा अतिवापर असो, की व्हॅलेंटाईन डेचा फिव्हर, नानाविध प्रकारे खास करून तरुणींना भुरळ घालून फसविण्याचे प्रकार घडले आहेत. ऑनलाइन चॅटिंगद्वारे मैत्रीचे जाळे टाकून फसव्या प्रेमाचे उमाळे फुटल्याचे भासवत जवळीक साधायची. त्यानंतर आर्थिक, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग करून इप्सित साधायचे, असे प्रकार वाढत असल्याची बाब बलात्काराच्या नोंद गुन्ह्यांवरून दिसून येत आहे. ही चिंताजनक बाब असून, त्यासाठी सजगता बाळगून सोशल मीडिया वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. 

फसवे प्रेम - बनावट फेसबुक अकाउंटच्या वापरातून रोमिओ, भामटे भुरळ घालतात. प्रेमाचे नाटक करतात. लैंगिक शोषणासाठी हा बहुदा प्रयत्न असू शकतो, अशा "हनी ट्रॅप'पासून स्वत:ला दूर ठेवा. 

 "फेक'बुक अकाउंट : सायबर भामटे, काही फेसबुक युजर्स, बनावट फेसबुक अकाउंटचा वापर करून तरुणींना भुरळ घालतात. वेगवेगळी छायाचित्रे अपलोड करून प्रपोजचाही प्रयत्न करतात. अशा प्रकारात तरुणी फसल्याची; तसेच काही तरुणींनीही तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. 

सायबर गोडीगुलाबी : व्हॉटस्‌ऍप, फेसबुकवरून रिक्वेस्ट पाठवून, गोड-गोड चॅटिंगमध्ये मुलींना अडकविण्याचे प्रकार होतात. ही मोडस वापरून रोमिओ, सायबर भामटे तरुणींना जाळ्यात ओढीत आहेत. 

फसवे बक्षीस : फेसबुक अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवायची, बक्षीस लागल्याचे सांगत गंडविण्याचा प्रयत्न करायचा, अश्‍लील फोटो असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न करायचा, सोशल मीडियावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी द्यायची, असाही एक फंडा भामटे करतात. 

आंधळी मैत्री : महाविद्यालयीन तरुणी असो वा शाळकरी, नोकरदार मुली मोबाईल, सोशल साईटच्या माध्यमातून ते तुमच्याशी थेट संपर्क करतात. आधी मैत्री नंतर प्रेम मग ब्लॅकमेलिंग व शोषण असे प्रकार मुलींसोबत झाले आहेत. 

सोशल धोका : व्हॉटस्‌ऍप, फेसबुक चॅटिंगद्वारे जवळीक व इप्सित साधण्याचा प्रयत्न होतो. अनोळखी व्यक्तींना टाळणे सोयीचेच ठरते. प्रेमाच्या बुरख्याखाली अनेकजण तुम्हाला जाळ्यात पकडण्यासाठी टपलेले असतात. त्यामुळे, जरा जपूनच सोशल साईटचा वापर करा. 

संशय घ्या, सावध राहा 
- अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्‍सेप्ट करू नका 
- फेसबुक अकाउंटच्या "अबाऊट'मध्ये अर्धवट माहिती असल्यास संशय घ्या 
- चॅटिंगची भाषा लगेचच ओळखा. मथितार्थ समजून विश्‍लेषण करा 
- अनोळखी युजर्स ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशांना टाळा 
- वारंवार मेसेजेस करणाऱ्यांना थारा देऊ नका 
- अतित्रास होत असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com