जिल्ह्याच्या वाट्याला मोठी पदे, मग विकास गेला कुठे?   

प्रकाश बनकर
मंगळवार, 25 जून 2019

  • भाजपतर्फे सात प्रमुखपदे मिळूनही पाणी, कचरा, रस्त्याचे प्रश्‍न कायमच 
  • तरी विदर्भात नागपूरचा एकजुटीने विकास होत आहे, तसा तो मराठवाड्यात किंवा जिल्ह्यात होतांना दिसत नाही

औरंगाबाद : केंद्रात, राज्यात आणि शहरात सत्तेत असलेल्या युतीमध्ये भाजपची ताकत वाढत चालली आहे. राज्यातील विधानसभा अध्यक्ष, राज्य महिला आयोग, राज्यमंत्रीपदासह सात प्रमुखपदे औरंगाबादच्या वाट्याला आली आहेत. ही पदे मिळाल्यानंतरही शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख प्रश्‍न अद्यापही 'जैसे थे' आहेत. पाणी, कचरा आणि रस्ते हे मुलभूत प्रश्‍न आतापर्यंत मार्गी लागणे गरजचे होते, मात्र तसे झाले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराला नव्याने राज्यमंत्रीपद आणि म्हाडाचे सभापतीपदही मिळाले. त्याचा उपयोग शहराच्या विकासासाठी होणार की मग केवळ हे पद शोभेचे बाहुले बनणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य बाल हक्‍क आयोग प्रविण घुगे, मराठवाडा विकास महामंडळ डॉ. भागवत कराड, रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्षपद प्रशांत बंब यांच्याकडे आहे. आता नव्याने उद्योग, खाण, अल्पसंख्याक, वक्‍फ राज्यमंत्री अतुल सावे तर औरंगाबाद म्हाडाचे सभापती संजय केणेकर यांना संधी मिळाली. काहींनी आपापल्या भागात पुढाकार घेतला, तर काही भाग दुर्लक्षितच राहिले. ज्या पद्धतीने विदर्भात नागपूरचा एकजुटीने विकास होत आहे, तसा तो मराठवाड्यात किंवा जिल्ह्यात होतांना दिसत नाही. कधी नव्हे ते जिल्ह्याला सात महत्वाची पदे मिळाली आहेत. पण जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी या नेत्यांमध्ये एकजूट होताना मात्र दिसत नाही. प्रमुख पदांवर विराजमान झालेल्या नेत्यांचे मुंबईत वजन आहे. त्याचा योग्य आणि पुरेपूर वापर केला तर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. 

बालेकिल्यात सेनेवर कुरघोडीचा प्रयत्न -
गेल्या 30-35 वर्षांपासून जिल्ह्यावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून शिवसेनेच्या बालेकिल्याला सुरूंग लावण्यास सुरवात झाली आहे. शतप्रतिश भाजप हा नारा पक्षाने प्रत्यक्षात उतरवण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात टप्याटप्याने भाजप नेतृत्वाने स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना बळ देत शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत बसवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तोडत पहिला झटका भाजपने शिवसेनेला दिला होता. यामुळे सेनेच्या आमदारांची संख्या दोनवर आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर शहरातील महापालिकेच्या सत्तेत भाजप बरोबरीचा वाटेकरी आहे, जिल्हा परिषदेत शिवसेनेने विधानसभेत युती तोडल्याचा वचपा म्हणून काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. पण आता तिथेही शिवसेनेला बाजूला खेचण्याच्या हालचाली भाजपच्या नेत्यांनी सुरू केल्या आहेत. 

या आहेत समस्या -
- शहरातील रस्ते, पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न अद्यापही कायमच 
- पर्यटनाला संधी असतांना कनेक्‍टीव्हीअभावी विकास खुंटला 
- चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त राहिले नावालाच 
- जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्देशा अद्यापही कायम 
- रोजगार, आरोग्य, शिक्षणाचे प्रश्‍न कायम 
- औद्योगिक क्षेत्रात नवीन गुंतवणुक नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are many problems in Aurangabad district despite the main posts of the legislators