कोरोनाच्या तंगीत अनेकांची नोटा सापडल्याने चांदी, पैसे हरवल्याची तक्रारही नाही, 

राजेश दारव्हेकर 
Thursday, 10 September 2020

जिंतूर - औंढा या राष्ट्रीय महामार्गावर औंढा नागनाथजवळील गोळेगावनजीक एका पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर पडलेल्या नोटा कोणाच्या आहेत ते कळायच्या आत अनेकांनी त्या खिशात घातल्या. पाहता पाहता जो-तो वाहन थांबवून पैसे उचलण्यासाठी गर्दी करु लागला. बुधवारी सकाळी घडलेल्या प्रकारानंतर गुरुवारी दुपारपर्यंत मात्र पैसे कोणाचे याची साधी तक्रार पोलिसांत दाखल झाली नव्हती, हेही विशेष.  

औंढा नागनाथ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांना पाचशेच्या नोटांनी मालामाल केले. जिंतूर-औंढा या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (ता.नऊ) सकाळी दहाच्या सुमारास पाचशेच्या नोटांचा पाऊसच पडला. पैशांचा मालक आणि लाभार्थी दोन्हीही शांत असल्याने पैसे कोणाचे, कशाचे आणि किती हे कळू शकले नाही. तरी अनेकांनी जमेल तेवढे पैसे उचलत आपले उखळ पांढरे करुन घेतले. 

औंढा नागनाथ येथून दोन किलोमीटर अंतरावरील नांदेड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर औंढा-जिंतूर फाट्यापासून ते गोळेगावनजीक एका पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर सकाळी अज्ञात वाहनातून पाचशे रुपयांच्या नोटा पडल्या. वारा असल्याने त्या अक्षरश: एक किलोमीटर अंतरापर्यंत पसरल्या. 

हेही वाचा - हिंगोली : जिल्हाधिकारी जयवंशी यांनी साधला कोरोना रुग्णांशी संवाद

४० ते ५० जण नोटांचे लाभार्थी 
रस्त्यावर पडलेल्या नोटा पाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनी चारचाकी, दुचाकी, ऑटो, सायकल थांबवून त्या गोळा केल्या. ज्यांना आधी संधी मिळाली ते मालामाल झाले. अर्ध्या तासात हा रस्ता साफ झाला. एका लाभार्थ्यानेच दिलेल्या माहितीनुसार, चालक, प्रवासी असे ४० ते ५० जण नोटांचे लाभार्थी ठरले. या नोटा कधी पडल्या, कुणाच्या आहेत, किती आहेत याची कुणालाही माहिती नाही. हा प्रकार जिंतूर- औंढा मार्गावर घडल्याने येथून जाणारे-येणारे अनेक जण मालामाल झाले. 

हेही वाचा - हिंगोली : ६३ खाजगी डॉक्टरांना कोरोना वॉर्डात सेवा करावी लागणार- रुचेश जयवंशी 

पोलिस म्हणतात, तक्रार आलेली नाही
या घटनेबाबत औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, नोटा हरवल्याबाबत किंवा गाडीमधून पडल्याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली नाही. परंतू, या रस्त्यावर जाणाऱ्या अनेकांच्या हाती नोटा लागल्याची माहिती मिळाली आहे. तक्रार आली तर पुढील चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अनेकांना मिळाली मदत  
एका लाभार्थ्यानेच दिलेल्या माहितीनुसार, चालक, प्रवासी असे ४० ते ५० जण नोटांचे लाभार्थी ठरले. या नोटा कधी पडल्या, कुणाच्या आहेत, किती आहेत याची कुणालाही माहिती नाही.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no complaints of loss of silver or money due to the discovery of many notes in the corona crisis. Hingoli News