गरज आहे महिलांना स्वातंत्र्य देण्याची

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

आजची स्त्री एकतर जास्तच सुखासीन किंवा जास्तच करिअरिस्टिक होते आहे का हा प्रश्न पडतो. स्पर्धा, तुलना, सुबत्ता, वस्तुकरण यांच्यामागे धावताना स्त्री बाहेरून  सक्षम पण आतून कमकुवत होतेय का असंही वाटतं. त्यापेक्षा गावगाड्यातली ग्रामीण स्त्री जास्त संतुलित आणि कणखर आहे असंही व्यक्तिगत निरीक्षण इथं नोंदवावसं वाटतंय. जोतिबांच्या सावित्रीला अपेक्षित शिक्षणातून साध्य करावयाची बाईची सक्षमता ती हीच का, हा प्रश्न आजच्यानिमित्ताने चिंतनाचा मुख्य गाभा असायला हवा.

नांदेड : राजकीय, सामाजिक, डॉक्टर, न्याय, पोलिस, लष्कर अशा विविध क्षेत्रांमध्ये आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. परंतु, पुरुषी अहंकारामुळे त्यांचे विचार दाबण्याचा प्रयत्न ठायीठायी होतो आहे.

महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केल्याने आज महिला उच्च शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रांत भरारी घेत आहेत. परंतु, त्यांना नोकरीच्या ठिकाणी; तसेच कुटुंबात विचारस्वातंत्र्य नाही. राजकीय तसेच प्रशासनामध्ये त्यांना कुठल्याही निर्णयप्रक्रियेमध्ये सामावून घेतले जात नाही. महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती अशा ठरावीक दिवशीच महिलांचा गौरव केला जातो. व्यासपीठांवरून ‘स्त्री शक्ती’विषयी भाषणे ठोकली जातात. वास्तविक पाहता एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीच असते. असे असताना तिला स्वातंत्र्य का दिले जात नाही? तिची अवहेलना का केली जाते? याचे चिंतन करण्याची वेळ आली आहे. नव्हे...नव्हे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज खरी गरज आहे ती पुरुषी अहंकार नाहिसा करून महिलांना स्वातंत्र्य देण्याची. 

हेही वाचलेच पाहिजे ‘या’ कारणामुळे गुदमरतोय ज्येष्ठांचा श्वास
 
महिलांनी हे करावे...
राजकारण, समाजकारण, नोकरी, घरी आदी ठिकाणी महिलांना स्वातंत्र्य नसले, तरी स्त्रियांनी स्वतःला कमी लेखता कामा नये. संस्कारक्षम पिढी तयार करण्याची शक्ती महिलांमध्येच असते. क्षमाशिलता असावी; परंतु समृद्ध, परिपूर्ण जीवन जगण्यासाठी व सुंदर जीवन जगण्यासाठी मुलांच्या मनावर सारखा सराव करवून घेणे हे आईचंच काम आहे. वैज्ञानिक कथा, शौर्य कथा मुलांना सांगितल्या पाहिजेत. मुलांमध्ये आत्मविश्‍वास व सहजसुंदर जीवन जगण्याचे विचार त्यांना दिले पाहिजे. सुविचार व साहित्यवाचन यांची गोडी निर्माण केली पाहिजे. आईने मुलांच्या हातात माणुसकी व चांगल्या संस्काराची मशाल हातात घेऊन जीवन जगण्याची कला शिकवावी. स्त्रियांमध्ये प्रचंड ऊर्जा व शक्ती आहे. ती सदैव मुलांच्या कल्याणासाठी व विकासासाठी वापरली पाहिजे असा संकल्प सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्यानिमित्ताने करावा.

टोकदार आत्मभान जागृत होणं महत्त्वाचं

Image may contain: 1 person, smiling, closeup
सुचिता खल्लाळ

महिला सक्षमीकरण ही केवळ सरकारी उपक्रमांतून साध्य होणारी  गोष्ट नाही, तर स्वतः महीलांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन जोवर सहिष्णू व सहवेदनेचा होणार नाही तोवर हे साधणार नाही. आरक्षणाने स्त्रीला संधी मिळाली पण कचठपुतळी होऊन ती दुस-या कोणाच्यातरी इशाऱ्यावर चालण्यात सौभाग्य मानत असेल तर असा कचकडी लिंगसमभाव काय कामाचा? ‘फुले, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र’ हे बिरूद भाषणात वापरण्यापुरते नाहीय; तसेच कथाकादंब-यातील किंवा टीव्ही चॅनेलवरच्या मनोरंजनात्मक मालिकेतला ‘फेमिनिझम’ ख-या वास्तवाशी लागू होणारा नाहीय हेही तेवढेच सत्य आहे. स्वतःतल्या स्त्रीत्वाचा वापर केवळ स्त्रीसुलभ सहानुभूती किंवा आरक्षणाचे लाभ मिळवण्यापुरताच न करता आपल्यातलं व्यापक आणि टोकदार आत्मभान जागृत होणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय खरे महिलासक्षमीकरण होणार नाही. पाॅलिटिकल अजेंड्यावरच्या फेमिनिझमची शिकार न बनता बाईनं जिजाऊ, सावित्रींचा बाणेदारपणा प्रत्यक्ष जगण्यावागण्यातून ठामपणे कृतीत आणायला हवा. 
- सुचिता खल्लाळ, शिक्षण विस्तार अधिकारी.

महिलांना आत्मनिर्भर बनविण्याची गरज

Image may contain: 1 person, selfie and closeup
संध्या कुलकर्णी

आपल्या समाजामध्ये अतिप्राचिन काळापासून महिलांना सन्मानजनक स्थान दिलेले आहे. वैदिक काळामध्ये महिलांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत पुरुषांबरोबर अधिकार दिलेले आहेत. वर्तमानामध्ये महिलांच्या विकासासाठी संविधानामध्ये पुरुषांबरोबर महिलांना अधिकार दिलेले आहे. देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी सर्व पदे महिलांनी भुषविलेली आहेत. शिवाय शैक्षणिक व सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये महिलांनी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. अग्रेसर आहेत. असे असतानाही, पुरुषावादी मानसिकता, पुरुषप्रभावयुक्त व्यवस्थेमध्ये महिलांना दुबळे समजले जात आहेत. घरगुती हिंसा, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होते आहे.  कुटुंब आणि समाजाच्या निर्मितीमध्ये महिलेचे स्थान खुप महत्त्वाचे आहे. समाजामध्ये महिलांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण आवश्‍यक आहे. त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनवले पाहिजे.
- संध्या प्रमोद कुलकर्णी (मुख्याध्यापिका, टायनी एंजल्स स्कूल)
 
रुढी-परंपरांमुळेच महिला आजही दुबळी

Image may contain: Shweta Wattamwar
श्वेता वट्टमवार

महिलांमध्ये असंख्य गुण आहेत. परंतु त्यांना वाव दिला जात नाही. आज घरची संपूर्ण जबाबदारी सांभाळून महिला कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक हातभार लावत आहेत. असे असतानाही तिला कुटुंबप्रमुखाच्याच सांगण्यानुसार वावरावे लागते.  आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर असल्यातरी त्यांना दुबळे समजले जात आहे. याला कारण आपली पुरुषप्रधान संस्कृती, सामाजिक बांधिलकी, दोन पिढ्यांमधील वैचारीक तफावत, पूर्वापार चालत आलेली भारतीय संस्कृती आणि देवाने बनविलेली महिलांची शारीरिक कोमलता. त्यामुळे कितीही कागदोपत्री कायदे निघाले तरी, तेवढी मुभा महिलांना नाही. उदा. प्रॉपर्टीत जरी समान हक्क आला तरी आज मुलगी तिच्या आई-वडिलांना हक्काने तिच्या घरी नेऊ शकते का? घरच्यांच्या परवानगीशिवाय मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकते का? यासाठी सामाजिक वैचारिक परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. घराघरांमधून जनजागृती व्हायला पाहिजे आणि हे कार्य करण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी लक्ष घालून ठोस पावले उचलायला पाहिजेत, असे मला वाटते.
- श्‍वेता सुनिल वट्टमवार, विभागीय अध्यक्ष (वासवी क्लब इंटरनॅशनल)
 
महिलांनी संघटित व्हावे

Image may contain: 1 person, closeup and indoor
भागिरथी बच्चेवार

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुली केल्याने स्त्री आज शिक्षित झाली आहे. जिजाऊ मॉं साहेबांनी मुलांवर संस्कार कसे करायचे याची शिकवण दिली; परंतु, आज स्त्रिला शिकूनही निर्णय प्रक्रियेत घेतला जात नाही. तिला वाचाराचेही स्वातंत्र्य नाही, याचे दुःख होते. स्त्रीमध्येच समाज परिवर्तन करण्याची किंबहुना मुलांमध्ये संस्काराची बीजे रुजविण्याची ताकद असते. जी, की पुरुषांमध्ये नाही. असे असतानाही तिला दुबळे समजले जात आहे. त्यामुळे आता महिलांनीच संघटित होऊन स्वतःला कमी लेखू नये. हिंमतीने कुटुंबात नोकरीच्या ठिकाणी तसेच समाजात खंबीर उभे राहून समाज परिवर्तन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. मी विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रमांतून महिलांचे संघटन करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासारख्या असंख्य महिला आज समाजात चांगली बीजे रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्यांना पाठबळ, प्रोत्साहन मिळत नाही, हे दुर्दैव आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने प्रत्येकानेच प्रतिज्ञा घेण्याची आज गरज आहे.
- भागीरथी बच्चेवार, सचिव (ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a need to give women freedom