महिलेची छेड काढणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई नाही

तानाजी जाधवर 
बुधवार, 11 एप्रिल 2018

अधिकाऱ्यांने एका महिलेची छेड काढल्याने संबधित युवतीने तक्रार देऊनही अद्यापपर्यंत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्यास विलंब केला जात आहे.

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या जगात वावरणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेकांना 'ताप' दिला जात आहे. आता तर या अधिकाऱ्याने एका महिलेची छेड काढल्याने संबधित युवतीने तक्रार देऊनही अद्यापपर्यंत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर शंकेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक महिला तक्रार देण्यासाठी ठाम असून, पोलिस मात्र तिने तक्रार मागे घेतल्याचे कारण पुढे करुन गुन्हा दाखल करण्यास विलंब करीत आहेत. मंगळवारची (ता. 10) अख्खी रात्र संबंधित महिलेला पोलिसांनी ठाण्यामध्ये बसवुन ठेवूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ही तक्रार दाखल होऊ नये, यासाठी त्या अधिकाऱ्यांने विविध मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत. राजकीय नेत्यांनी हजेरी लावुन पोलिसांना गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी प्रयत्न चालविला असल्याची चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद व पोलिस ठाण्यामध्ये दबक्या आवाजात ही सगळी कहाणी आता चांगलीच चर्चेला येत आहे.

अविवाहित महिलेने पोलिस ठाण्यामध्ये येऊन त्या अधिकाऱ्याच्या विरोधात पोलिसांना सविस्तर माहिती सांगून तक्रार दाखल करावी, अशी मागणी केली आहे. तेव्हा पोलिसांनी या महिलेचे म्हणणे ऐकत काही वेळाने गुन्हा दाखल होईल, असे सांगितले. त्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान संबधित महिलेला ठाण्यामध्ये बोलविण्यात आले, तेव्हा तो अधिकारीही तिथेच होता. पण पहाटे पाचपर्यंत गुन्हा दाखल केलाच नाही. मात्र पोलिसांच्या या प्रकारामुळे या महिलेला विनाकारण मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेकांना ताप  ठरलेल्या अधिकाऱ्याविरोधात राजकीय दबावाला बळी पडत पोलिसांनीही हातावर हात ठेवुन सर्व काही ज्या अधिकाऱ्यावर आरोप आहेत, त्याच्या बाजुने झुकते माप देण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा आहे.

पोलिसांना या प्रकरणावर विचारले असता, संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याचे सांगितले आहे. त्यातही पोलिस निरीक्षक डी. बी. घात सकाळपासून फोन उचलत नसून, संदेश पाठवुनही उत्तर देत नाहीत.या महिलेची विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची मागणी असूनही चतुर अधिकाऱ्यांने राजकीय नेत्यांच्या मदतीने युवतीवरच दबाव आणण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बुधवारी (ता. 11) दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is no action on the senior official who has been harassing the woman