गुन्हे मागे घेणार नाही; तोपर्यंत नर्सिंगची परीक्षाही नाही 

अतुल पाटील
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांना शुक्रवारी (ता. 13) विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी निवेदन दिले. मात्र, गुन्हा मागे घेता येणार नाही, न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करावीच लागेल, असे आयुक्‍तांनी सांगितले.

औरंगाबाद - एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पर्यवेक्षक आणि प्राचार्य यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत शहरातील कोणत्याच महाविद्यालयात परीक्षा घेणार नाही. असा पवित्रा शहरातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकांनी घेतला. 

पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांना शुक्रवारी (ता. 13) विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी निवेदन दिले. मात्र, गुन्हा मागे घेता येणार नाही, न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करावीच लागेल, असे आयुक्‍तांनी सांगितले. निवेदन दिल्यानंतर द्वारसभेत अनेक प्राचार्य, प्राध्यापक आक्रमक झाले होते. मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान म्हणाल्या, "एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पोलिसांनी राजकीय लोकांच्या दबावात येऊन गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुंना सोमवारी (ता. 16) भेटू. त्यांच्यातर्फे शासनाला निवेदन पाठवू. जोपर्यंत गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच विभागीय आयुक्‍त यांच्या कार्यालयाबाहेरही लाक्षणिक उपोषण करु.'' या इशाऱ्याला सर्व प्राचार्य, प्राध्यापकांनी संमती दर्शविली. 

निवेदन देण्यासाठी डॉ. वैशाली प्रधान, डॉ. मझहर फारुखी, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. आर. एस. पवार, डॉ. मिलिंद उबाळे, डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. खैरनार, डॉ. संतोष भोसले, डॉ. निलेश पाटील, डॉ. एस. जी. देशमुख, डॉ. उत्तम काळवणे, डॉ. विजया मुसांडे, रझाउल्ला खान, मोहम्मद मोहसीन, एम. आर. खान, प्रकाश तौर, शांतीलाल राठोड आदी तीनशेहुन अधिक प्राध्यापक उपस्थित होते. 

बामुक्‍टोनेही दिले निवेदन -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्‍टो) पोलिस आयुक्‍तांना निवेदन दिले. "कॉपी पकडली आणि त्यानंतर आत्महत्या होत असेल, त्याला प्राचार्य, प्राध्यापकांना जबाबदार धरले गेल्यास भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यास प्राचार्य, प्राध्यापक तयार होणार नाहीत. या प्रकारणाची सर्वांगिण शहानिशा करुन गुन्हा मागे घ्यावा.'' असे निवेदनात म्हटले असून त्यावर डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. एस. टी. अलोने, डॉ. एम. पी. कुलथे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: There is no examination of nursing in the city aurangabad