Loksabha 2019 : विजयी मिरवणुकीला परवानगी नाहीच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

औरंगाबाद - लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दल व राज्य राखीव पोलिस दलाचे प्रत्येकी एक प्लाटून तैनात राहतील. तसेच मिरवणुकीला परवानगी मिळणार नसल्याची बाबही आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. 

औरंगाबाद लोकसभेसाठी 23 एप्रिलला मतदान झाले. आता महिनाभरानंतर गुरुवारी (ता. 23) चिकलठाणा परिसरात मतमोजणी होणार आहे. चौरंगी लढतीमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार असून, गतवर्षीच्या दंगलीची पार्श्‍वभूमी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोचणार नाही यासाठी ठोस उपाय राबविण्यात येणार आहेत. त्यासाठीच एक हजार 654 पोलिसांसोबतच राज्य व केंद्रीय राखीव बलाचे प्रत्येकी एक प्लाटून बंदोबस्तावर तैनात राहील. यादरम्यान विविध ठिकाणी फिक्‍स पॉइंट लावण्यात आले आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले. 

शहरातील बंदोबस्त 
- 2 पोलिस उपायुक्‍त 
- 2 सहायक पोलिस आयुक्‍त 
- 19 पोलिस निरीक्षक 
- 83 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक 
- एक हजार 82 पोलिस कर्मचारी 
- 150 महिला कर्मचारी 

मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्त 
- 1 पोलिस उपायुक्‍त 
- 2 सहायक पोलिस आयुक्‍त 
- 10 पोलिस निरीक्षक 
- 30 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक 
- 200 पुरुष पोलिस कर्मचारी 
- 60 महिला कर्मचारी 

बारा कॅमेरामनची मदत 
मतमोजणीवेळी मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार व त्यांचा प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वाद होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. विशेषत: बारा कॅमेरामनही तैनात राहतील. ते घटना - घडामोडींचे छायाचित्रण करतील व शहरातील हालचालींवर लक्ष ठेवतील. 

अंतिम निकालानंतर विजयी असो की अन्य कोणालाही मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राखावी. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no permission to victory rally