आघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे जाहीर केले.

लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे जाहीर केले.

लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये भारिप बहुजन महासंघातर्फे दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याआधी आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेसने आम्हाला आघाडीसाठी बोलावले. त्यादृष्टीने आमच्या चारवेळा बैठका झाल्या; पण एकाही बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नव्हते. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिक ठाकरे हे नेते होते. या बैठकीत आम्ही काँग्रेसकडे 12 जागांची मागणी केली. पण याच जागा द्या, असे म्हटले नाही. उलट ज्या मतदारसंघात तुमच्याकडे सक्षम उमेदवार नाही किंवा जेथे तुमच्या उमेदवाराचा आजवर पराभवच झालेला आहे, अशा 12 जागा आम्हाला द्या. पण काँग्रेसने या सगळ्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तो देण्याऐवजी तुम्ही एमआयएमशी युती का केली, असे प्रश्न ते आम्हाला विचारत बसले.’’

सरकारने अर्थव्यवस्था बिघडवली
भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये सत्तेत येताना फार मोठ्या अपेक्षा दाखविल्या. विकासाचे स्वप्न दाखवले. विकासाचा मुद्दा पुढे करून लोकांकडून मते घेतली. पण गेल्या साडेचार वर्षात विकासाचा स्तर वाढला नाही, धोरणात्मक आणि कल्पकतेच्या दृष्टीने. उलट जो गाडा व्यवस्थित चालू होता, तो या सरकारने बिघडवला. अनेक कुटूंब स्वत:च्या पायावर उभे राहत होते. शेती, व्यवसाय, उद्योग करून जगत होते. पण नोटाबंदीचा निर्णय घेऊन सरकारने लोकांना आर्थिकदृष्ट्या अस्थिर करून टाकले. लोकांकडे असणारा पैसा काढून घेतला. बँकाची स्थितीही चांगली नाही. बडे उद्योजक कोट्यावधी रुपये घेऊन पळून जात आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थाच बिघडली आहे. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. नोकऱ्यावर असलेल्यांना काढून टाकले जात आहे. बेरोजगारी वाढत आहे. त्यात सरकारने जीएसटी आणून व्यापाऱ्यांनाही अडचणीत आणले आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

आरक्षणाचा निर्णय दंगलीसाठी
सरकारने अचानकपणे मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावून दिले आहे. पण सरकारला अशा निणर्यातून दंगली घडवायच्या आहेत. सवर्ण विरूद्द ओबीसी, असे चित्र देशभरात तयार करायचे आहे. त्या जोरावर केंद्रात पून्हा एकदा सरकार आणायचे आहे. पण हा डाव लोकांनीच हाणून पाडला आहे. लोक आता शहाणे झाले आहेत. ते राजकीय डावपेच ओळखतात. शिवसेनेला अयोध्येत पाठविण्याचा भारतीय जनता पक्षाचा डावपेच लोकांनी बरोबर ओळखला. त्यामुळेच दंगली झाल्या नाहीत. मी जनतेच्या सतसद्‌ विवेकबुद्धीला दाद देतो, असेही आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

Web Title: There is no positive response from congress for alliance says Prakash Ambedkar