पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ उस्मानाबादेत निदर्शने

सयाजी शेळके 
बुधवार, 23 मे 2018

पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांत १० ते १२ रुपयांनी इंधनाचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे भाव स्थिर असतानाही तेलाचे भाव वाढले जात आहेत.

उस्मानाबाद - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २३) काँग्रेसच्या जिल्हा शाखेच्या वतीने निदर्शने करीत मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील देशपांडे स्टॅंड नजीक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदविला. 

पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांत १० ते १२ रुपयांनी इंधनाचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे भाव स्थिर असतानाही तेलाचे भाव वाढले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. महागाईमध्ये वाढ होत आहे. जनतेमध्ये पेट्रोल-डिझेल दराच्या बाबत असंतोष पसरत आहे. जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष विश्‍वास शिंदे यांनी दिली. ‘पेट्रोल- डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे. 'मोदी सरकार हाय-हाय', 'इंधन दरवाढ करणाऱ्या शासनाचा निषेध असो', अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

मोदी सरकारच्या धोरणावर तीव्र नापसंती व्यक्त करीत जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर, युवक काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर, पालिकेतील पाणीपुरवठा समितीचे सभापती सिद्धार्थ बनसोडे, अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक धनंजय राऊत, शिला उंबरे, खलिल सय्यद, धनंजय वीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मोजकेच कार्यकर्ते सहभागी -
पेट्रोल- डिझेल दरवाढीचा सर्वांनाच फटका बसत आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यासह विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दरवाढीवरून नाराजी आहे. त्यामुळे अशा आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर राहू शकतात. मात्र जिल्हा काँग्रेसच्या या आंदोलनाला मोजकेच कार्यकर्ते हजर होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There was a protest in osmanabad against the petrol and diesel price hike