'मुद्रा'तील गोंधळ होणार कमी

प्रकाश बनकर
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

सार्वजनिक, खासगी बॅंका, ग्रामीण बॅंक, मायक्रो फायनान्स व छोटे फायनान्स अशा 47 बॅंकांना जिल्ह्यात मुद्रा कर्ज योजनेसाठी 629 कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार 714 कोटींपर्यंत कर्जवाटपासाठी मागणी लाभार्थींकडून आली.

औरंगाबाद : बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेत शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला गोंधळ आता थांबणार आहे. सरकारतर्फे जिल्ह्यातील बॅंकांना देण्यात आलेल्या कर्जांची उद्दिष्टपूर्ती झाल्यामुळे आता कर्ज योजना मंजूर होण्याची शक्‍यता कमी असल्याचे बॅंकांतर्फे सांगण्यात येत आहे. 

सार्वजनिक, खासगी बॅंका, ग्रामीण बॅंक, मायक्रो फायनान्स व छोटे फायनान्स अशा 47 बॅंकांना जिल्ह्यात मुद्रा कर्ज योजनेसाठी 629 कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार 714 कोटींपर्यंत कर्जवाटपासाठी मागणी लाभार्थींकडून आली. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत एक फेब्रुवारीपर्यंत 691 कोटी रुपयांचे मुद्रा कर्जवाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टापेक्षा 61 कोटी जास्त कर्जवाटप जिल्ह्यात करण्यात आले आहे. 

 

sakal

पाच फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बॅंकांच्या झोनल मॅनेजरची बैठक घेत कर्जप्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात दलाल, बॅंकांचे भ्रष्ट अधिकारी आणि काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्रा कर्ज योजनेची वाट लावली. त्यामुळे वाटप झालेल्या मुद्रा कर्ज योजनेचा एनपीए वाढत चालला आहे. प्रत्येक बॅंकेतून जवळपास 50 लाखांच्या एनपीएची यादी समोर येत आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून या दलालांनी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच अशासकीय सदस्य चंद्रकांत हिवराळे, राजेश मेहता यासह अन्य लोकांनी कर्ज मंजूर करण्यासाठी दबाव आणण्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. हे प्रकरण 'सकाळ'ने लावून धरल्यानंतर पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. दबावतंत्र कमी झाले. आता उद्दिष्टपूर्ती झाल्यामुळे बॅंकांनाही राजकीय दबावापासून सुटका मिळाल्याचे बोलले जात आहे. 

  • जिल्ह्यातील मुद्रा योजनेतील कर्जवाटपावर नजर (एक फेब्रुवारीपर्यंत) 

 

बॅंक संख्या कर्जदारांची संख्या मुद्रा योजना कर्जवाटप 
स्टेट बॅंक ऑफ इंडिया 2578 103 कोटी 2 लाख 
18 सार्वजनिक बॅंका 4868 141 कोटी 1 लाख
12 खासगी बॅंका 27229 145 कोटी 27 लाख 
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक 1564 38 कोटी 35 लाख 
10 एनबीएफसी मायक्रो फायनान्स 75841 191 कोटी 51 लाख 
5 छोटे फायनान्स बॅंक 21226 71 कोटी 55 लाख 
एकूण - 47 बॅंकांच्या माध्यमातून 133371 691 कोटी 6 लाख 

बहुतांश बॅंकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीनुसार कर्जाविषयी आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. 
- प्रदीप कुतवळ, लीड बॅंक 

Web Title: There will be no confusion in the mudra scheme