प्राणिसंग्रहालयात आजपासून होणार या प्राण्यांचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

सहा महिन्यांची प्रतीक्षा संपणार

औरंगाबाद-महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यांपूर्वी समृद्धी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता. मात्र, या बछड्यांना अद्याप मोकळ्या वातावरणात सोडले नव्हते. आता शहरवासीयांची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (ता.16) या बछड्यांना पहिल्यांदाच पिंजऱ्याबाहेर काढले जाणार आहे. 

मराठवाडा, विदर्भातील जनतेसाठी महापालिकेचे एकमेव प्राणिसंग्रहालय आकर्षणाचे केंद्र आहे. सहलीच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी, हजारो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. पर्यटकांसाठी वाघ हे सर्वांत मोठे आकर्षण आहे. प्राणिसंग्रहालयात सध्या आठ मोठे वाघ तर चार बछडे आहेत. समृद्धी नावाच्या वाघिणीने 26 एप्रिलला दोन पांढऱ्या तर दोन पिवळ्या अशा चार बछड्यांना जन्म दिला. आतापर्यंत या बछड्यांना पिंजऱ्याबाहेर काढलेले नाही. ते आई समृद्धीसोबतच पिंजऱ्यात होते. बछड्यांना खुल्या वातावरणात सोडण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र पावसाळी वातावरणामुळे त्यांना बाहेर सोडले नाही. आता इतर वाघांप्रमाणेच या बछड्यांना मोकळ्या; पण बंदिस्त जागेत पर्यटकांच्या दर्शनासाठी सोडले जाणार आहे. हे बछडे सध्या सहा महिन्यांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना खुल्या वातावरणात सोडण्यात येत असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना कळविले आहे. 
 
सकाळच्या वेळेस काढणार बाहेर 
बुधवारपासून रोज काही वेळासाठी या बछड्यांना पिंजऱ्याबाहेर सोडले जाईल. सुरवातीचे काही दिवस सकाळी दोन आणि सायंकाळी दोन तास याप्रमाणे आणि नंतर दिवसभरासाठी बाहेर सोडण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these animals will take place the zoo starting today