‘मॉर्निंग वॉक’चे ‘हे’ आहेत फायदे

प्रमोद चौधरी
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

‘मॉर्निंग वॉक’चे ‘हे’ आहेत फायदे

‘मॉर्निंग वॉक’चे ‘हे’ आहेत फायदे

नांदेड : दिवाळी झाली आणि गुलाबी थंडी आता हळूहळू जाणवायला लागली आहे. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी व आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नागरिकांनी मॉर्निंग वॉक सुरु केले आहे. पहाटेच्या सुमारास नांदेड शहरातील सर्वच प्रमुख तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते गजबजल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी नागरिक आवड म्हणून फिरायला जात असत. परंतु, जीवनशैलीतील बदलांमुळे फिरणे हे आता सुदृढ आरोग्यासाठी गरज निर्माण झाली आहे. हिवाळ्यात सकाळी फिरायला जाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते. म्हणूनच हल्ली सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शहराच्या चारही बाजूंचे रस्ते सकाळी माणसांनी फुलून गेलेले असतात. सद्यःस्थितीत मानवी जीवनात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. यामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. परिणामी विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागली आहे. मानसिक ताणालाही अनेकांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांना आळा घालण्याच्या हेतूने बहुतेकांनी मॉर्निंग वॉकचा आधार घेतानाचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. 

प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा आज गतीमान झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जणच तणावामध्ये रहात आहे. विशेष म्हणजे यातून शालेय विद्यार्थीही सुटलेले नाहीत. वाढलेली स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने मुले आज कोमेजून गेली आहेत. सकाळी उठल्यावर शाळा, शाळेतून आल्यावर शिकवणी, शिकवणीवरून आल्यावर अभ्यास असा दिवसभर विद्यार्थी गुंतून रहात असल्याने खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, मानसिक तणावाचे बळी हे विद्यार्थी ठरत आहेत.

--असे आहेत फायदे
मॉर्निंग वॉकमुळे दिवसभर प्रसन्न वाटते. स्वभावात परिवर्तन होऊन सकारात्मक भावना वाढीस लागते. पती-पत्नी सोबत फिरायला जात असतील तर त्यांचे नाते अधिक गहिरे होते. परस्पर विश्वास वाढून एकमेकांना सांभाळून घेण्याची भावना वाढते. समूहाने फिरायला जात असाल तर आपापसातील गमती जमती, हसणे यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते. हसण्यामुळे रक्त प्रवाहाची गती वाढते. डोकेदुखीची समस्या कमी होते. सकारात्मक भावनांचा संचार होतो. शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढते.  वाढता ब्लडप्रेशर, शुगर, हृदयासंबंधित आजार, डिप्रेशन, निद्रानाश यासारख्या अनेक आजारांवर मॉर्निंग वॉकचा खूप फायदा होतो. 
----
कोट
आरोग्य चांगले राहण्यासोबतच मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती, तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते. आशावादी व्यक्तीला तणाव जाणवत नाही. ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, वाढते वजन या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मॉर्निंग वॉकला अवश्य जा.
- डॉ. अविनाश कुलकर्णी (नांदेड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are the benefits of 'Morning Walk'