हे रंग तुम्हाला भुरळ घालताहेत...तर सावधान...!

गणेश पांडे | Wednesday, 23 September 2020

मास्क घेतांना कोणत्याच सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला नियमाचे उल्लघंन करून मास्कची विक्री केली जात आहे.

परभणी ः कोरोनाविरुध्दच्या लढाईत जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनाने युध्द पातळीवर काम सुरु केले आहे. लोकांचा कोरोना विषाणुचा बचाव व्हावा यासाठी मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतू मास्क घेतांना कोणत्याच सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला नियमाचे उल्लघंन करून मास्कची विक्री केली जात आहे. त्यामुळे कोरोनाची साथ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

परभणी शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार या वर्दळीच्या ठिकाणी काही विक्रेते रंगीबेरंगी मास्कची विक्री करीत आहेत. अश्या विक्रेत्यांभोवती लोकांची मोठी गर्दी जमत आहे. प्रत्येक जण मास्क घेवून तोंडाला लावून आरश्यामध्ये पाहून खरेदी करताना दिसत आहे. अश्या खरेदीमध्ये पाच ते सहा मास्क तोंडाला लावून पाहिले जातात. यातून संसर्गाची शक्यता १०० पटीने असते. एखादा व्यक्तीजर संसर्ग झालेला असेल किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील असेल आणि त्याने जर हा मास्क स्वताच्या तोंडाला लावून पाहिलेला असेल तर त्यापासून लागण होण्याची शक्यता कैक पटीने अधिक असते.  यातून शहरात संक्रमण वाढण्याचा धोका वाढला आहे. आज पर्यत प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाच धोक्यात येऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा -  परभणीत मृतांचा एकूण आकडा दोनशे पार, दिवसभरात पाचची भर -

घरी तयार केलेले मास्कच योग्य

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे शहरात मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सुती मास्क वापरण्याकडे सर्वांचा कल आहे. परंतू रस्त्यावरील मास्क घेतल्यानंतर त्यावर धुळीचे सुक्ष्म कन असतात. त्याच बरोबर अनेकांनी हा मास्क ट्राय केलेला असू शकतो. त्यामुळे याचा धोका बसू शकतो. त्यामुळे स्वताच्या घरात स्वच्छ धुतलेल्या सुती कपड्याचे मास्कच वापरणे योग्य आहेत.

नागरीक काय म्हणतात...

शहरात अनेक ठिकाणी अश्या प्रकारचे मास्क विक्री केले जात आहेत. याचा धोका होऊ शकतो. रस्त्याच्या कडेला लावलेली दुकानांत सर्रास उघड्यावर हे मास्क लटवले जातात. ते तातडीने थांबविणे गरजेचे आहे.- अभिषेक कुलकर्णी, नागरीक, परभणी

डॉक्टर काय म्हणतात...

उघड्यावरील  मास्क घातकच ठरू शकतात. त्यावर धुळीचे कण तर बसतात. ते आरोग्यास घातक ठरू शकतात. शक्यतो स्वच्छ पांढरा सुती रुमाल वापरला तरी चालतो.- डॉ. दीपक करजगीकर, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे