ते नालीच्या घाणीत शोधतात सोन्याचे कण

अविनाश काळे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

उमरगा : पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्‍या समाजाची परवड 

उमरगा (जि.उस्मानाबाद) : एकीकडे दिवाळी सणाच्या लख्ख प्रकाशात आनंदोत्सव साजरा करणारा समाजवर्ग, तर दुसरीकडे दररोजच्या उदरनिर्वाहासाठी फिरस्ती समाजाची होणारी अवहेलना पाहून सामाजिक विषमतेची दरी दर्शविणारे वास्तव चित्र मन हेलावून टाकणारे आहे. ऐन सणात सोने-चांदीच्या दागिने विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. हे दागिने बनविताना सोन्याचे पडणारे सूक्ष्म कण नालीच्या घाण पाण्यात शोधून काहीजण आपला उदरनिर्वाह भागवितात. पहाटे साडेपाचपासून आंध्रप्रदेशातील एक कुटुंब नालीच्या घाणीत सोन्याचा शोध घेत पोटाची खळगी भरण्याचे स्वप्न पाहत असल्याचे विदारक चित्र शहरातील सराफ लाईनमध्ये दिसून आले.

सामाजिक विषमतेची दरी काही केल्या कमी होत नाही. भटक्‍या विमुक्त समाजाला समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्याला प्रारूप स्वरूप प्राप्त होत नाही. अजूनही हजारो कुटुंबे आकाशाला छत समजून नैसर्गिक ऋतूचा सामना करीत पालावरचं जगणं जगताहेत. समाजातील अनेक चिमुकल्यांना दहा-वीस रुपयांसाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील भंगार, प्लास्टिकच्या बाटल्या जमा कराव्या लागताहेत. भटक्‍यांना उदरनिर्वाहासाठी सारखी भटकंती करावी लागते. कधी बहुरूपीच्या वेशात, तर कधी उघडपणे भीक मागावी लागते. जीवन जगण्यासाठी जहिराबाद (आंध्रप्रदेश) येथील चंदू पत्री यांच्या कुटुंबाचा गेल्या अनेक महिन्यांपासून उमरग्यात मुक्काम आहे. शहरातील सराफ लाइन मोठी आहे. जवळपास सोने-चांदी विक्रीची चाळीस दुकाने आहेत. या दुकानांतून दररोज लाखोंच्या दागिन्यांची विक्री होते. सोने महाग झाले तरी उच्चभ्रू लोकांकडून त्याची खरेदी होतेच. दागिने तयार करण्याचे काम करणारे अनेक कारागीर आहेत.

हेही वाचा : तुम्ही दहावी पास आहात का ? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी 

दागिने तयार करताना कधी कधी सोन्याचे अगदी सूक्ष्म कण आजुबाजुला पडतो. ते दिसून येत नसल्याने कधी कचऱ्यातून फेकला जातो. तर कधी नालीच्या पाण्यात मिसळतो. या कणांचा शोध घेण्यासाठी भटके समाजातील काही कुटुंब धावपळ करतात. पहाटे साडेपाचपासून या कामाची लगबग सुरू होते. नालीत उतरून लोखंडी टोपल्याने घाण बाहेर काढली जाते आणि त्यात पाणी टाकून सोन्याचे सूक्ष्म भाग शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. तासन्‌तास शोध घेतल्यानंतर काही मिळालं तर ठिक, नसता मेहनत वाया जाते.

गुरुवारी (ता.14) सकाळी सात वाजता चंदूसह त्याचे कुटुंबीय या कामात व्यस्त होते. नालीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास असह्य होत असतानाही आई चिमुकल्या मुलीची समजूत घालत आपले काम करीत होती. त्या चिमुकलीला अंगणवाडी माहिती नाही, ना बालदिन. सामाजिक बांधिलकीचे डोस पाजणाऱ्या समाजवर्गाला त्या चिमुकलीचा बालदिनानिमित्त सन्मान करण्याचे भान राहिले नाही. समाजातील भिन्नतेचे वास्तव कधी संपेल आणि नालीच्या घाण पाण्यातून जगण्याची पारदर्शकता दाखविण्याचा प्रकार कधी बंद होईल, यासाठी सुस्तावलेल्या राज्यकर्त्यांना कधी जागं येईल आणि भटका समाज समाजाच्या प्रवाहात कधी येईल, याची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 
हेही वाचा : " या ' निरीक्षकावर अपहाराचा गुन्हा 
'ये तो किस्मत है...' 
उदरनिर्वाहासाठी आलेल्या चंदूच्या बोलण्यात नशिबाला आलेलं जगणं बरच कांही सांगून जात होत. अनेक वर्षांपासून असलं काम आम्ही करतो. आमचं जगण्याचं हे साधनच झालं आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या पेहरावाचा आम्हाला हेवा वाटत नाही. त्यांच्यासाठी तयार केलेल्या दागिन्यांतून खाली पडलेलं, नालीत साचलेल्या घाणीतून काही मिळेल याची आम्हाला अपेक्षा असते. नशिबांन मिळालं तर सही... दिवाळी सणाच्या निमित्ताने अधिक दागिने तयार होतात. त्यातून आमच्या टोपलीत काही तर सापडतं आणि त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या शे-पाचशे रुपये संसाराला उपयोगी पडतात, अशा शब्दात चंदू पत्री यांनी आपली व्यथा मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They find gold particles in drainage