सुकामेवा चोरुन विकला अन..दारु खरेदी केली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

जुना मोंढ्यातील दुकान फोडणारा जेरबंद 

औरंगाबाद - सुदृढता, निरोगीपणा वाढावा म्हणून सुकामेवावर ताव मारण्यावर असंख्यजनांचा भर असतो. परंतु सुकामेवा दुकानातून चोरुन विकायचा व मिळालेल्या पैशांतुन दारु खरेदी करीत घशात रिचवण्याचा प्रकार काही महाभागांनी केल्याचा प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. जुन्या मोंढ्यातील दुकान फोडून चोरांनी हा प्रकार केला असुन त्यातील एकाला गुन्हेशाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (ता.12) शहागंज भागात करण्यात आली. 

जुना मोंढा भागात दीप ट्रेडर्स या दुकानासह इतर दोन दुकानांचे शटर उचकटून 24 जुलैला रात्री चोरांनी चोरी केली. यात दीप ट्रेडर्समधून 17 हजार रुपये रोख, मोबाईलसह काजू, बदाम, पिस्ता, इलायचीचा माल चोरी केला. याबाबत तेजलाल संपतलाल बंब (रा. सिडको एन-तीन) यांनी तक्रार दिली. त्यानुसार यात क्रांती चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांचा तपास सुरू असताना गणपती विसर्जनादरम्यान गुन्हे शाखेचे अजबसिंग जारवाल यांना जुना मोंढ्यातील चोराबाबत माहिती समजली. यानंतर त्यांच्या पथकानी शहागंज भागातून शेख उमेर शेख आरेफ (वय 27, रा. शरीफ कॉलनी) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर साथीदारासोबत जुना मोंढ्यात दुकान फोडल्याबाबत त्याने कबुली दिली. अशी पोलिसांनी माहिती दिली. संशयिताला क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आपसांत वाटुन घेतली रक्कम 
संशयित शेख उमेर याने दोन साथीदारांसोबत दुकान फोडून चोरी केली, सतरा हजारांची रक्कम तिघांनी आपसात वाटून घेतली. चोरी केलेला सुकामेवा किरकोळ दराने बाजारात विकला. मिळालेल्या पैसे दारुवर फस्त केल्याची बाब पोलि सुत्रांनी सांगितली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief arrested