काल सुटला अन्‌ आज घरफोड्या!

मनोज साखरे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

  • कार्डवरील अट्टल गुन्हेगार अटकेत 
  • मोगलीसोबत करीत होता चोऱ्या 

औरंगाबाद - एका गुन्ह्यात औरंगाबादेतील हर्सूल कारागृहातून सुटला; पण खर्चासाठी पैसेच नव्हते मग त्याने लगेच दुसऱ्याच दिवशी एक दोन नव्हे तर तब्बल चार घरफोड्या केल्या. ऐन दिवाळीत लोक घरांना कुलूप लावून गावी गेल्यानंतर त्यानेही दिवाळी साजरी केली; मात्र त्याच्या घरफोडीचा फटाका पोलिसांनी फोडला आणि त्याला बेड्या ठोकल्या. 

सूर्यकांत ऊर्फ सनी गोपीनाथ जाधव (रा. क्रांतीनगर, कोकणवाडी) असे संशयिताचे नाव आहे. रविवारी (ता. 17) पुंडलिकनगर पोलिस गस्तीवर असताना त्यांना सनीबाबत माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली तेव्हा तो हुनमाननगर येथील गल्ली क्रमांक पाच येथे भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली.

"मी 24 नोव्हेंबरला कारागृहातून सुटलो; पण खर्चासाठी पैसे नव्हते म्हणून साथीदार मोगलीसोबत दुसऱ्याच दिवशी घरफोड्या सुरू केल्या. कांचनवाडी भागात मोगलीसोबत वाईनशॉप व इतर तीन घरं फोडली; मात्र नंतर मोगलीला सातारा पोलिसांनी अटक केली. पोलिस सनीच्या मागावर होते, मी राजनगर येथे राहत होतो. त्यामुळे मी हनुमाननगर येथे राहण्यासाठी
दोनच दिवसांपूर्वी आलो.'' अशी त्याने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला रविवारी अटक करण्यात आली असून, ही कारवाई सहायक निरीक्षक घनःश्‍याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, हवालदार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, स्वप्निल विटकेर, शिवा बुट्टे
यांनी केली.  

महिलेचे मंगळसूत्र हिसकावले 
मुलीसोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचे बत्तीस हजारांचे मंगळसूत्र चोराने हिसकावले. ही घटना गुरुवारी (ता. 14) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पवननगर परिसरात घडली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मीना सुनील आहेरकर (वय 48, रा. एम- 2, संत ज्ञानेश्‍वरनगर) या मुलीसोबत पवननगर येथील एका दुकानात ड्रेस शिवून घेण्यासाठी जात होत्या. त्या दुकानाजवळ आल्या. त्याच वेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून दोघे पाठलाग करीत आले. यातील एकाने मीना यांच्या गळ्यातील बत्तीस हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. यानंतर त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. याप्रकरणी मीना यांच्या तक्रारीनुसार चोरांविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करीत आहेत.
 
विविध ठिकाणांहून वाहनांची चोरी 
शहरात गत दोन दिवसांत चोरांनी दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन लंपास केले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात शनिवारी (त. 16) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

महत्त्वाची बातमी :  दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी

दिनकर त्र्यंबक मुंढे (रा. जाधववाडी) यांची दुचाकी जाधववाडी येथील त्यांच्या घरासमोरून चोराने लंपास केली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सुरेश भिवसन लहासे (रा. आन्वापाडा, ता. भोकरदन) यांची दुचाकी चोराने तेरा नोव्हेंबरला सायंकाळी किराणा चावडी येथून लंपास केली. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.
रस्त्याच्या कडेला उभा केलेला हायवा ट्रक चोराने लंपास केला. ही घटना जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी लक्ष्मण अर्जुन खरात (इंदिरानगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

हेही वाचा : Video : अंधारून येताच सरोवरावरून उडतात राक्षसी जीव 

हे वाचले का? : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested in Aurangabad