नांदेड : दर्शनासाठी गेलेल्या मित्र-मैत्रीणीला लुटले; खंजर आणि दगडाने वार

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 17 एप्रिल 2019

चोरांनी युवकाशी वाद घालून पर्स घेण्याचा प्रयत्न करत असतांना चोरट्यांनी खंजरने त्याच्या पोटात जबर दुखापत केली. तसेच दगडाने त्याचे डोके फोडले

नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या काळेश्‍वर दर्शनासाठी जात असलेल्या एका युवतीसह दोघांना लुटले. यावेळी चोरट्यांनी खंजरने युवकाच्या पोटात तर दगडाने डोक्यात जबर दुखापत करून पन्नास हजाराचा ऐवज जबरीने चोरून नेला. ही घटना सोमवारी (ता. 15) सायंकाळी सातच्या सुमारास मामा चौक परिसरात घडली. उपचारानंतर मंगळवारी (ता. 16) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. 

शहराच्या हनुमानगढ परिसरातील नभांगण अपार्टमेंटमध्ये राहणारा अथर्व अशोक पाटील (वय 22) हा आपल्या मैत्रीणीला घेऊन काळेश्‍वर मंदीराला दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी मामा चौक ते असर्जन रस्त्यावर पोहचताच पाठीमागून दुचाकी (एमएच 26-4846) वरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी अथर्व पाटील याची दुचाकी अडविली. त्याच्या मैत्रीणीची पर्स जबरीने हिसकावून घेतल्याने अथर्व पाटील हा पर्स मागण्यासाठी पुढे आला. यावेळी त्याच्याशी वाद घालून पर्स घेण्याचा प्रयत्न करत असतांना चोरट्यांनी खंजरने त्याच्या पोटात जबर दुखापत केली. तसेच दगडाने त्याचे डोके फोडले. त्याच्या मैत्रीणीच्या गळ्यातील सोन्याची 25 हजाराची चैन जबरीने तोडून घेतली. तसेच तिच्या पर्समध्ये नगदी 600 रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, प्लस कंपनीचा मोबाईल आणि 25 हजार रुपये किंमतीचा कारचा रिमोट कंट्रोल असा 50 हजार 600 रुपयाचा ऐवज जबरीने चोरून नेला. भयभीत झालेल्या मैत्रीणीने जखमी अवस्थेत त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले.

उपचारानंतर त्यानी नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार व वैद्यकीय कागदपत्र दाखवून तक्रार दिली. यावरून अनोळखी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद हे करीत आहेत.

Web Title: thief looted friends in Nanded