चिंता वाढली : उस्मानाबादेत सापडला तिसरा कोरोनाग्रस्त, या गावातून पुन्हा...

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा उपजिल्हा रुग्णालयात एक जण कोरोना पाॅझीटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. आधीच्या दोनही रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. पण आता हा त्यांच्या संपर्काव्यतिरिक्त नवा रुग्ण आढळून आल्याने उस्मानाबादमध्ये चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. 

उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एक, तर लोहारा तालुक्यातील धानूरी येथील एकाला कोरोना विषाणुचा संसर्ग झाला होता. या दोघांच्या संपर्कातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या दोघांवर रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गुरुवारी रात्री एकाच दिवशी हे दोन रुग्ण पाॅझीटिव्ह असल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आले होते. या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला होता.

आता तिसरा रुग्ण पुन्हा उमरगा तालुक्यातील बलसूर याच गावातून सापडला आहे.  

शुक्रवारी (ता.तीन) जिल्ह्यातील ५३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये एकट्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एक जण विषाणूच्या संसर्गाने बाधित झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

परंतु, हा नवा कोरोनाग्रस्त आधीच्या दोन्ही तरुणांच्या संपर्कातील नसल्याचेही समोर आले आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत, त्याच्या धानूरी येथील चार नातेवाईक, तर आष्टाकासार येथील चार नातेवाईकांना तपासणीसाठी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आधीच्या रुग्णांच्या तपासाची पार्श्वभूमी

एक एप्रिलला पानिपत-दिल्लीमार्गे बलसूर येथे परतलेला एक तरुण व त्याची पत्नी यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील तरूणाचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तरुणाच्या कुटुंबासह नातेवाईकाचे चौदा आणि संपर्कात आलेल्या पंधरा जणांना स्वॅब तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तर उमरगा शहरातील एक विवाहित तरुण व त्याची आई दिल्ली शहराजवळील एका गावात धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते, ते दोघेही शहरात येऊन आठवडा झाला, मात्र ते कुटुंबापासून दूर रहात असल्याची माहिती मिळाली; तरीही प्रशासनाने खबरदारी म्हणून त्या दोघांना गुरुवारी मध्यरात्री रुग्णालयात आणले. त्यांचा स्वॅब तपासणी साठी घेण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com