काले धनवालों का मुँह काला - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - देशातील पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद करायचा निर्णय घेतल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. चिंता काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनी करावी, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मेहनत की कमाई करणेवालों का बोलबाला होगा, और काले धनवालों का मुँह काला होगा' असा शेरही पत्रकार परिषदेत ऐकविला. 

औरंगाबादेत "डीएमआयसी'अंतर्गत आयोजित कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले की, "प्रधानमंत्री यांनी काळ्या पैशांच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात निर्णायक भूमिका जाहीर केली. यामुळे भ्रष्टाचाराने कमाविलेल्या पैशांवर निर्बंध येणार आहेत. या निर्णयाने सामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांना मोठा फायदा मिळेल. नागरिकांनी घाबरण्याची आवश्‍यकता नाही. कायदेशीररीत्या कमाविलेला पैसा सुरक्षित आहे. दोन दिवसांनंतर बॅंकेत जाऊन आपल्याकडे ज्या पाचशे-हजाराच्या नोटा प्रामाणिकपणे कमाविलेल्या आहेत, त्या बॅंकेत जमा करता येतील. वेगळ्या नोटा घेता येतील.' 

""आज अनेक लोक चिंतेत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांनी त्यांचा माल विकलेल्या असल्याने त्यांच्याकडे रोख पैसा आलेला आहे. आमच्या नोटा आता वाया जाणार आहेत का? असा प्रश्‍न पडला आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की तुमचा पैसा बिलकूल वाया जाणार नाही. आपल्याकडील नोटा उद्या बॅंका उघडल्यानंतर जमा करा. तुमचा पैसा तुमच्याजवळच राहील. ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे, ज्यांनी गैरमार्गाने पैसा कमाविलेला आहे, त्यांच्यावर मात्र चिंताग्रस्त होण्याची वेळ आली आहे. टोलनाक्‍यावर अडचणी येत आहेत. त्यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या असून, लोकांची अडवणूक होणार नाही याचा प्रयत्न सुरू आहे,'' असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Those who have black money they have to worry about