अवैध वाहतूक करणारी जिल्ह्यात हजारावर वाहने

अवैध वाहतूक करणारी जिल्ह्यात हजारावर वाहने

एसटीचे दररोज ४५ लाखांचे नुकसान; पोलिस, आरटीओशी मिलीभगत

लातूर - जिल्ह्यात विविध मार्गांवर दररोज एक हजाराहून अधिक बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असून या वाहनांतून वीस हजार प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे. सतराशे फेऱ्यांतून ही वाहने बिनदिक्कतपणे प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत आहेत. या वाहनांमुळे अनेक मार्गावर दररोज ४५ लाख रुपयाचे नुकसान सहन करावे लागते.

उदगीर तालुक्‍यातील नांदेड-बिदर रस्त्यावर रविवारी (ता. १७) रात्री झालेल्या अपघातात बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतील आठ प्रवाशांना जीव गमवावा लागला. यानंतर जिल्ह्यात पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) आशीर्वादाने सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीचा पर्दाफाश झाला. यात एसटीच्या बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांवरून बसगाड्यांऐवजी खासगी वाहनांतूनच प्रवासी वाहतूक सुरू आहे. गावागावात प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या संख्येने उदयास आली आहेत. या वाहनांच्या संख्येमुळे अनेक भागात एसटीच्या बसगाड्यांना प्रवासी हाती लागत नसल्याने उत्पन्न बुडत आहे. यामुळे काही मार्गावर एसटीने बससेवा बंदही केली आहे. 

एसटीकडून दरवर्षी बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण केले जाते. २१ ते २४ सप्टेंबर २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात ८७ मार्गावर ९५५ बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने आढळून आली. यात व्हॉल्वो- आठ, स्लिपर- ७५, लझ्करी- ८१, साधी बस- ७२, जीप- ३२२, मेटॅडोर- १२, तर इतर वाहने ४०३ होती. या वाहनांच्या दिवसाला एक हजार ६९२ फेऱ्या होत असून वाहनांतून १७ हजार २८० प्रवासी प्रवास करताना आढळले. यातून एसटीचे दररोज चाळीस लाख ४८ हजार दोनशे रुपये उत्पन्न बुडत असल्याचे पुढे आल्याचे विभाग नियंत्रक एस. के. लांडगे यांनी सांगितले. यानंतर दोन जुलै २०१६ रोजी २४ तासांत सर्वेक्षण केल्यानंतर या वाहनांची संख्या वाढून ती हजाराच्या पुढे गेली असून दररोज एसटीचे सरासरी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याचे आढळले आहे.

का वाढते अवैध वाहतूक?

खराब रस्त्यामुळे एसटीची असमर्थता

प्रवासी क्षमतेनुसार संख्येचा अभाव

अनेक वाहनांचे मालक पोलिसच

कारवाई केल्यास प्रवाशांचीच अडचण

रोजगारासाठी वाहन चालविणे सोयीचे

काय आहेत उपाय?

एसटी बसगाड्यांची संख्या वाढवा

जीप, ऑटोसाठी प्रवासी मर्यादा

वेग नियंत्रणासाठी कारवाई

ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती हवी

बसस्थानकाजवळून वाहने हटवावीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com