टाळ-मृदंगाच्या गजरात पायी दिंडी : पहा video

विशाल अस्वार
रविवार, 26 जानेवारी 2020

पहाटेपासूनच गावात भाविकांची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे गावातील रस्ते रांगोळीने सजविले होते. पायी दिंडीचे मार्गक्रमण सुरू होताच ठिकठिकाणी भाविकांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे पूजन केले. दिंडीत सहभागी भाविकांकरिता चहापाणी, नाश्‍त्याची गावात व्यवस्था केली गेली.

वालसावंगी (जि.जालना) - टाळ-मृदंगाच्या गजरात शनिवारी (ता. 25) शेगावकडे सकाळी पायी दिंडी रवाना झाली. गावातील सुमारे 1 हजार 700 भाविकांचा या दिंडीत समावेश आहे. 

वालसावंगी (ता.भोकरदन) ते शेगाव दिंडीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच गावात भाविकांची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे गावातील रस्ते रांगोळीने सजविले होते. पायी दिंडीचे मार्गक्रमण सुरू होताच ठिकठिकाणी भाविकांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे पूजन केले. दिंडीत सहभागी भाविकांकरिता चहापाणी, नाश्‍त्याची गावात व्यवस्था केली गेली. गावातील एकूण वातावरण हे भक्तिमय झाले होते. विविध भजन पथके या दिंडीत सहभागी झाली आहेत.

हेही वाचा : गुऱ्हाळ आता बोटांवर मोजण्याइतपत

पायी दिंडीस शुभेच्छा देण्याकरिता जिल्हा परिषद सदस्या अरुणा वाघ, सरपंच रंजना बाळू आहेर, पंचायत समिती सदस्या ज्योती पवार, उपसरपंच संदीप लोखंडे, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोथळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव भुते, तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथळकर, अनिलकुमार लाठे, संजय कोथळकर, कैलास फुसे, माजी सभापती लक्ष्मण मळेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, किरणराजे कोथळकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

पायी दिंडीचे चौदावे वर्ष

दरम्यान, यंदा पायी दिंडीचे हे चौदावे वर्ष आहे. जवळपास पाच दिवस पायी अंतर कापून ही दिंडी शेगावला पोचते. दिंडीचा पहिला मुक्काम 25 तारखेला देऊळघाट, दुसरा मुक्काम 26 तारखेला वरवंट फाटा, तिसरा मुक्काम 27 तारखेला वन विभाग बोथा येथे राहील. त्यानंतर 28 तारखेला दिंडी शेगाव येथे पोचेल. शेगाव ट्रस्टतर्फे दिंडीतील सहभागी भाविकांचा गौरव करण्यात येतो. 

जादा बस सोडण्याची मागणी 

परतीच्या वेळी दिंडीत सहभागी शेकडो भाविकांसाठी शेगाव ते वालसावंगी जादा बस उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली आहे. याबाबत बुलडाणा येथील आगाराचे विभागीय नियंत्रक श्री. रायलवार यांना श्री. पवार यांनी नुकतेच निवेदन दिले. यावेळी सुनील मोकासरे, दिनेश कोथळकर यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of devotees leave for Shegaon