लातूर कपडा बँकेने भागवली हजारो जणांची गरज

हरी तुगावकर
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

दिवाळीला सुरवात झाली आहे. पैसेवाल्यांची दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. पण अनेक चिमुकल्यांच्या अंगावर चांगले कपडे नाहीत अशी अवस्था आहे. एका दानशूर व्यक्तींनी चिमुकल्यांचे २०० पेक्षा ड्रेस या बँकेला दिले. पाडव्या दिवशी शहरातील विविध वस्त्यात जावून तेथील चिमुकल्यांना हे कपडे देवून त्यांची दिवाळी गोड केली जाणार आहे.

लातूर- `रोटी, कपडा आणि मकान` या प्रत्येकाच्या तीन गरजा आहेत. पण अनेकांना रोटीसाठी झगडावे लागते. अनेकांचे तर रस्ते हेच घर असते. तर अनेकांना चांगले कपडेही मिळत नाहीत. समाजात सातत्याने दिसून येणारा हा प्रकार आहे. किमान गरजूच्या अंगावर चांगले कपडे असावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतून येथे लातूर कपडा बँक सुरु झाली.

पाहता पाहता बँकेला दोन वर्ष होत आहेत. या कालावधीत 54 हजार 510 कपडे जमा करून 49 हजार 128 कपडे मोफत देवून गरजूंची गरज पूर्ण करण्यात बँकेला यश आले आहे. मराठवाड्यात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत कपड्यांची उलाढाल करणारी ही एकमेव बँक ठरत आहे.

ना नफा ना तोटा
बँक म्हटले की पैसे ठेवणे व पैसे काढणे हेच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसते. नफा तोट्याचा व्यवहार पाहिला जातो. तेथे व्याज तर असतेच. पण सामाजिक बांधिलकी नसते. सामाजिक बांधिलकी हेच कपडा बँकेचे उद्दीष्ट आहे. येथील डॉ. संतोष डोपे यांना डिसेंबर 2016 मध्ये ही संकल्पना सूचली. काही मित्रांशी त्यांनी बोलून दाखवली. यातून या बँकेची उभारणी झाली. या करीता डॉ. सूर्यकांत निसाळे, डॉ. अजय पुनपाळे, सुनील डोपे, राजाभाऊ शिंदे, राजेंद्र शिंदे, रामदास काळे यांनी पुढाकार घेतला.

बँकेची जागाही मोफत
कपडा बँकेचा उपक्रम सुरु करताना जागेचा प्रश्न होता. मोक्याच्या ठिकाणच्या जागा मिळणे परवडणारे नव्हते. त्यामुळे या सर्वांनी जागेचा शोध सुरु केला. हा सामाजिक उपक्रम पाहून विशाल अग्रवाल पुढे आले. त्यांनी येथील शिवाजी चौकातील आपली जागा या उपक्रमासाठी अगदी मोफत दिली आहे. इतर साहित्य देखील काही दानशूर व्यक्तींनी दिले. यातून ही बँक उभारली गेली.

बँकेत असे घेतले जाते दान
वापरात नसलेले कपडे एकत्र करून गरजू व्यक्तींना ते देण्यासाठी बँकेत घेतले जातात. कपडे फाटके नसावेत. व्यवस्थित धुवून, इस्त्री करून आणून दिलेले कपडे घेतले जातात. लहान मुले ते वृद्धापर्यंतच्या विविध वयोगटातील येथे कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक कपड्याची नोंदही ठेवली जात आहे.

रुग्णालय, मेळावे घेवून वाटप
बँकेत कोणताही गरजू येवून कपडे घेवून जावू शकतो. दिवसभर बँक उघडी असते. बँकेने शासकीय रुग्णालयात जावून गरजूंना कपडे वाटप केले. काही वस्त्यात जावून तेथे कपडे दिले. ता. ३१ डिसेंबरला तर ५६ हजाराचे स्वेटरचे वाटप केले.

चिमुकल्यांना मिळणार नवीन कपडे
दिवाळीला सुरवात झाली आहे. पैसेवाल्यांची दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. पण अनेक चिमुकल्यांच्या अंगावर चांगले कपडे नाहीत अशी अवस्था आहे. एका दानशूर व्यक्तींनी चिमुकल्यांचे २०० पेक्षा ड्रेस या बँकेला दिले. पाडव्या दिवशी शहरातील विविध वस्त्यात जावून तेथील चिमुकल्यांना हे कपडे देवून त्यांची दिवाळी गोड केली जाणार आहे.

Web Title: Thousands of people have joined the Latur Cloth Bank