राज्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांना अनुदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

राज्यातील काही शेतकऱ्यांनी अनुदानाची वाट न पाहता शेततळ्यात स्वखर्चाने प्लॅस्टिक आच्छादन केले आहे. अशा शेतकऱ्यांना आच्छादनासाठी अनुदान मिळणार नाही. म्हणून या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत स्वतः खर्च करू नये.
- डॉ.सु. ल. जाधव, फलोत्पादन संचालक

शेततळ्यासाठी प्लॅस्टिक अस्तरीकरण योजना
औरंगाबाद - राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांत राज्यात खोदलेल्या शेततळ्यांची संख्या 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त आहे. मात्र ही शेततळी प्लॅस्टिक अस्तरीकरणाअभावी तशीच पडून आहेत. 2016-17 मध्ये राज्यातील 3 हजार 500 शेतकऱ्यांना "प्लॅस्टिक अस्तरीकरण योजने‘तून अनुदान स्वरूपात प्रति शेतकरी 75 हजार रुपये अनुदान देणार असल्याची माहिती राष्ट्रीय फलोत्पादन संचालक डॉ. सु. ल. जाधव यांनी दिली.

मागेल त्याला शेततळे, कडधान्य विकास योजना, कापूस विकास योजना या राज्य सरकारच्या योजनांबरोबरच केंद्र सरकारच्या नरेगा, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसोबतच स्वतः खर्च करत खोदलेल्या शेततळ्यांची संख्या वाढत आहे. काही अडचणींमुळे शेतकऱ्यांना अद्याप प्लॅस्टिक अस्तरीकरण करता आले नाही. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन विभागाने उचललेली पावले शेतकऱ्यांसाठी निश्‍चितच दिलासादायक ठरणारी आहेत.

यंदाच्या वर्षात राज्यभरातून साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या संख्येबाबत डॉ. जाधव यांना विचारले असता, कोणतीही खास अट नसल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्यांकडे शेततळ्यात पाणी भरण्याची सोय, फळबाग, भाजीपाला लागवडीची सोय असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनुदान देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असून, आठ ते दहा दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल.

 

Web Title: Three and a half thousand farmers in the state grant