ऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक

हरी तुगावकर
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

लातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल व पाच जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. हे तरुण काही गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

लातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल व पाच जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. हे तरुण काही गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या सूचनेवरून गुरुवारी रात्री ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती. ही मोहिम सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना काही तरुणांकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या सूचनेवरून सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर व त्यांच्या पथकाने पंकज शाम पारिख (वय 22, रा. पशूपतीनाथनगर, आदर्श कॉलनी) याला ताब्यात घेतले. तो रहात असलेल्या फ्लॅटमध्ये छापा टाकला. तेथे पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतूसे जप्त केली. या पिस्टलच्या संदर्भात त्याची पोलिसांनी अधिक चौकशी केली.

पंधरा दिवसापूर्वी त्याचा मित्र प्रतिक दगडू केदार (रा. केंद्रेवाडी, ता. चाकूर) याने मध्यप्रदेशातून बेकायदेशीररीत्या दोन देशी बनावटीचे पिस्टल व 11 जीवंत काडतूसे आणल्याचे सांगितले. ते आपण खरेदी केले. त्यापैकी एक पिस्टल व दोन काडतूसे स्वतः जवळ ठेवून घेतली. दुसरे पिस्टल व तीन जीवंत काडतूसे त्याचा मित्र मंगेश दिलीप सोनकांबळे (रा. लेबरकॉलनी) यास विक्री केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मंगेशवर छापा टाकला. यात त्याच्याकडून एक पिस्टल व तीन काडतूसे जप्त करण्यात आली. 

यात पोलिसांनी प्रतिक केदार, पंकज पारिख व मंगेश सोनकांबळे याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जीवंत काडतूसे, मोबाईल असा एकूण 45 हजार 250 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तरुणांवर जिल्ह्यात खून, खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा करणे अशी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या करीता पोलिस अधिक्षक डॉ. माने व अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नागरगोजे, बावकर, भिष्मानंद साखरे, रवि गोंदकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, संतोष खांडेकर, मुंडे, युवराज गिरी यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Three arrested in Operation Allout