तीन सहायक उपनिरीक्षकांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

लातूर - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलिस खात्यातील अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारे राष्ट्रपती पोलिस पदक येथील जिल्हा पोलिस दलातील तीन सहायक पोलिस उपनिरीक्षकांना जाहीर झाले आहेत. एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाल्याने लातूर जिल्हा पोलिस दलाची मान उंचावली आहे. 

दरवर्षी शासनाच्या वतीने पोलिस खात्यात गुणत्तापूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस पदक देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडून पोलिस महासंचालकांना प्रस्ताव पाठविले जातात. त्यानंतर राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे हे प्रस्ताव पाठविले जातात. राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हे पदक जाहीर केले जातात. पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी असे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. यात पोलिस खात्यात वीस वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा केल्याबद्दल येथील पोलिस मुख्यालयातील अशोक बाबूराव गायकवाड, पोलिस नियंत्रण कक्षातील विद्याधर रंगनाथ टेकाळे व जिल्हा विशेष शाखेतील जगन्नाथ देविदास सूर्यवंशी यांना शासनाने पोलिस पदक जाहीर केले आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या यशाबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कारही केला.

Web Title: Three assistant sub inspectors President's Police Medal declared