घाटीत जन्मले तिळे, प्रसूती नॉर्मल

याेगेश पायघन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

  • आईसह दोन मुले, एका मुलीची प्रकृती ठणठणीत 
  • डॉक्‍टरांनी गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी केली
  • पहिले मूल 2400, दुसरे 2200, तर कन्यारत्न 2070 ग्रॅमचे

औरंगाबाद-एरवी तिळे जन्मण्याची शक्‍यता असेल तर सिझर होण्याचीच शक्‍यता जास्त असते. खासगी रुग्णालयांमध्ये तर थोडी जरी धोक्‍याची शक्‍यता वाटली तर महिलेचे सिझेरियन करण्याचा सल्ला हमखास दिला जातो; परंतु शासकीय घाटी रुग्णालयात एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला, तोही नॉर्मल प्रसूतीने. अर्थात, यासाठी घाटीच्या डॉक्‍टरांनी कौशल्याने ही प्रसूती केली. 

वैजापूर तालुक्‍यात गारज येथील निलोफर अजिज सय्यद (वय 24) यांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या डॉक्‍टरांनी ही गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी केल्याची माहिती स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली. तिळ्यांमध्ये दोन मुले, तर एक मुलगी असून तिन्ही अपत्ये ठणठणीत आहेत. 

कोण म्हणाले - महापरीक्षा पोर्टल बंद करा

प्रसूतीपूर्व उपचार घेतले नियमित
निलोफर यांच्या यापूर्वी दोन प्रसूती झाल्या असून, त्यांना चार व दोन वर्षांची दोन मुले आहेत. मंगळवारी रात्री दोन वाजून 20 मिनिटांनी त्यांनी दोन मुलांसह एका मुलीला जन्म दिला. प्रसूती विभागाच्या डॉक्‍टरांनी यशस्वीपणे प्रसूती केल्याने मातेसह तिन्ही बालके सुखरूप आहेत. पहिले मूल 2400, दुसरे 2200, तर कन्यारत्न 2070 ग्रॅम वजनाचे आहे. वैजापूरला केलेल्या पहिल्या सोनोग्राफीत तिळे आढळल्याने तेथील डॉक्‍टरांनी निलोफर यांना घाटीत रेफर करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी घाटीत स्त्रीरोग विभागात प्रसूतीपूर्व उपचार नियमित घेतले. सोमवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजता त्या वैजापूरवरून घाटीत प्रसूतीसाठी दाखल झाले. डॉ. गडप्पा यांच्या पथकातील डॉ. अंकिता शहा, डॉ. नेहा लोहिया, डॉ. अश्‍विनी कोल्लुर, डॉ. शीतल भगत, डॉ. मोनिका नाथाणी, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड यांनी महिलेवर उपचार केले. तिळे असताना बहुतांशवेळी सिझरची गरज भासते; मात्र प्रसूती विभागाने कौशल्याने ही प्रसूती नॉर्मल केली. 

नातेवाइकांनी मानले आभार 
तिन्ही बाळांचे वजन चांगले असल्याने "एनआयसीयू'ची गरज भासली नाही. गेल्या वर्षभरात एकही तिळे घाटीत जन्मले नव्हते. या वर्षातील पहिली तिळे जन्मली असल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले. घाटीच्या प्रसूती विभागाने सुरवातीपासून केलेल्या सहकार्याबद्दल नातेवाइकांनी घाटीच्या डॉक्‍टरांचे आभार मानले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनीही डॉ. गडप्पा यांच्या पथकाचे अभिनंदन केले. 
असं कसं झालं - सत्ता भाजपची, महापौर मात्र कॉंग्रेसचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three children born in the ghati, delivery normal