पोस्टातून परत आलेल्या परवान्यांनी भरली तीन कपाटे!

पोस्टातून परत आलेल्या परवान्यांनी भरली तीन कपाटे!

औरंगाबाद - आरटीओतून वाहन परवाने आणि आरसी (वाहन नोंदणी प्रमाणपत्र) घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोस्टाच्या नाकर्तेपणामुळे आरटीओत उलट टपाली परत आलेले परवाने व ‘आरसी’ने तब्बल तीन कपाटे भरली आहेत. हे परवाने परत घेण्यासाठी नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आरटीओ आणि पोस्ट अशा दोन्ही कार्यालयांच्या समन्वयाअभावी नागरिक त्रस्त आहेत. 

आरटीओ कार्यालयातून वाहन परवाना आणि आरसी पोस्टाने पाठविण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. दोन्ही कार्यालयांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना वाहन परवाना आणि आरसी वेळेवर मिळत नाही. गेल्या काही दिवसांत पोस्टाने शेकडो लोकांचे टपाल दिलेच नाही. पत्ता सापडत नसल्याचे कारण देत हे टपाल पुन्हा आरटीओ कार्यालयात परत आले. पोस्टाने परवाना किंवा आरसी येईल म्हणून नागरिक वाट पाहतात. त्यासाठी पोस्टात आणि आरटीओ कार्यालयात चकरा मारतात. तेव्हा ‘अजून आले नाही’ एवढाच शब्द दोन्ही कार्यालयांतून मिळतो. तब्बल महिना उलटल्यानंतर मात्र तेच टपाल आरटीओ कार्यालयात परत येऊन पडलेले असते. आरटीओ कार्यालयात परत आलेल्या वाहन परवाना किंवा आरसीसाठी पुन्हा पन्नास रुपये मोजावे लागतात. 

नागरिकांना दुहेरी भुर्दंड 
आरटीओ कार्यालयात वाहन परवाना किंवा आरसी हातोहात दिली जात नाही. हे दोन्ही पोस्टाने पाठवण्यात येते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात पोस्टाचा खर्च पन्नास रुपये पूर्वीच कापून घेतला जातो. पोस्टाचे पैसे भरल्यानंतरही पोस्टमनमार्फत वितरण होण्याऐवजी गठ्ठे परत येतात. नागरिकांना परत आलेला परवाना किंवा आरसी आरटीओ कार्यालयातून परत घेण्यासाठी पुन्हा पन्नास रुपये भरावे लागतात. 

पत्ता बरोबर असतानाही...
आरटीओचा ऑनलाइन अर्ज भरताना, पत्ता चुकला तर टपाल परत येणे अपेक्षित आहे. मात्र पत्ता बरोबर असतानाही टपाल परत येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे आरटीओचे अधिकारी आणि पोस्टाचेही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com