कचरा उचलण्यास आता तीन दिवसांची डेडलाइन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - पावसाळ्यास सुरवात झालेली असतानाही शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न महापालिकेने सोडवलेला नाही. आजही रस्त्याच्या कडेला, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. पावसाचा धोका ओळखून हा कचरा महापालिकेने तीन दिवसांत उचलावा, असे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याबाबत माहिती देताना बुधवारी (ता. १३) शासन नियुक्त संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, की कचराकोंडीवर मात करण्यात महापालिका अद्यापही पूर्णपणे यशस्वी झालेली नाही. विविध विभागात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

पावसाळ्यात कचऱ्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक  घेण्यात आली. महापालिका प्रशासनास तीन दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांकडून घनकचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा दिला जात नसल्यास दंडात्मक कारवाई महापालिकेने करणे आवश्‍यक आहे. हे नमूद करून ते म्हणाले, कचरा प्रश्‍न मनपाने तत्काळ मार्गी लावणे अपेक्षित आहे. संनियंत्रण समितीने कचरा टाकण्यासाठी पाच जागा निश्‍चित केल्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधी नागरिकांच्या विरोधानंतर दोन महिने कचरा टाकणे थांबविण्यात आले. मात्र, उर्वरित चिकलठाणा, हर्सूल आणि पडेगाव येथे वर्गीकृत कचरा टाकून त्यावर निर्धारित कालावधीत प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पण त्याही कामाला अपेक्षित गती आलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

कचरा उचला अन्यथा शासनापुढे वास्तव मांडू
विविध भागांत एक हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा महापालिका प्रशासनाने तीन दिवसांत उचलावा, अन्यथा शासनास अहवाल पाठवून वास्तवाची माहिती दिली जाईल, असा इशारा डॉ. भापकर यांनी दिला आहे. डीपीआरनुसार घनकचरा प्रक्रियेसाठी मशिनरी खरेदीचा निर्णय आला होता; परंतु ही मशिनरी कंत्राटदारांनी खरेदी करावी. त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्गही संबंधित गुत्तेदारांनी भरावा, असेही यावेळी ठरविण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय महापालिकेने तातडीने घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Three day deadline to lift garbage