बीडमध्ये दोन घटनांत तीन मुलांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

आई घरकामात असताना तेजश्री घरालगतच्या परिसरात खेळत होती. बराच वेळ झाला, तरी ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता घरालगतच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळला

बीड - जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 12) वेगवेगळ्या दोन घटनांत तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

खंडाळा (ता. बीड) गावाजवळच्या नागनाथ मंदिर परिसरात असलेल्या कल्लोळात विजय सुंदर काटे (वय 8), कार्तिक प्रभाकर जगताप (9) हे सकाळी पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी भरत असताना तोल जाऊन ते कल्लोळात पडले. त्यात दोघांचाही बुडून जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांसह नेकनूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चव्हाण यांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृत कार्तिक जगताप हा राहता (जि. नगर) येथील असून, तो लग्न समारंभासाठी पालकांसोबत खंडाळा येथे आला होता.

पिंपरी घाटा (ता. आष्टी) येथे शेततळ्यात बुडून बालिकेचा मृत्यू झाला. तेजश्री पांडुरंग आमटे (वय 3) असे तिचे नाव आहे. आई घरकामात असताना तेजश्री घरालगतच्या परिसरात खेळत होती. बराच वेळ झाला, तरी ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता घरालगतच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळला.

तिचे वडील सैन्यदलात भोपाळ येथे कार्यरत आहेत. उन्हाळी सुटीनिमित्त चार दिवसांपूर्वीच ते गावी आले होते.

Web Title: three dead in beed