तीन अपघातांत जिल्ह्यात तिघे ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

बीड - मंगळवारी (ता. एक) जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन अपघातांत तिघे ठार झाले. केज, पाटोदा तालुक्‍यात दोन, तर बीडजवळ अपघाताची एक घटना घडली.

बीड - मंगळवारी (ता. एक) जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन अपघातांत तिघे ठार झाले. केज, पाटोदा तालुक्‍यात दोन, तर बीडजवळ अपघाताची एक घटना घडली.

मंगळवारी पहाटे लातूर येथून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस (एमएच ०९ ईएम २४६८) सकाळी साडेसहा वाजता होळच्या पुढे आल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना अरुंद रस्त्याच्या खाली उतरली व उलटली. या अपघातात बसचालक भागवत दादाराव केंद्रे (वय २६, रा. उंडेगाव), रेणुका कल्याण माळी (वय ३०, माळी चिंचोली) आणि अमर जियाउद्दीन सिद्दिकी (वय नऊ, लातूर) हे तिघे गंभीर जखमी झाले. तर पांडुरंग भीमराव म्हेत्रे (वय ५६, केज), राजू सानुजी इवले (वय २६, औरंगाबाद) आणि सतीश गणपत गव्हाणे (वय ३०, बोरगाव) हे जखमी झाले. जखमींतील रेणुका कल्याण माळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतरांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. बसमध्ये प्रवाशांची संख्या आणि बसचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळली. 

दुसरा अपघात पाटोदा-महासांगवी रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडला. दुचाकीला (एमएच २३ आर १४७९) अज्ञात वाहनाने धडक दिली. यात माणिक विठ्ठल कांबळे (४०, रा. उक्कडपिंप्री) हे गंभीर जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्य्‌ृ झाला. तिसरी घटना बीड शहरातील बार्शी नाका पुलावर सायंकाळी घडली. दुचाकीला (एमएच २३ व्ही ७५११) ट्रकने (एमएच  डब्लू ३६८९) धडक दिल्याने दुचाकीस्वार ज्ञानोबा सोपानराव नाईकवाडे (६२, रा. लक्ष्मीनगर, बीड) हे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ट्रक ताब्यात घेतला असून चालक राम मंचक दातार (रा. बेलगाव, ता. केज) यास पोलिसांनी अटक केली. पेठबीड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: three death in three accident