उस्मानाबाद : पोलिस असल्याचे भासवून भामट्यांनी केले सात तोळे सोने लंपास

yh.jpg
yh.jpg

उस्मानाबाद ः शहरातील एका ज्येष्ठ महिलेला पोलिस असल्याचे भासवून भामट्यांनी सात तोळे सोने लंपास केले आहे. शहरातील सावकर चौकामध्ये रविवारी (ता. १८) दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

दरम्यान शहरात चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू असताना आता दिवसाही ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणुकीचे प्रकार घडू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांतून प्रश्‍नचिन्हा उपस्थित केले जात आहे. 
शहरात चोरीचे प्रकार नवे नाहीत. भर वस्तीमधील घरफोड्या, कुलूत तोडून ऐवज लंपास करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता भरदिवसा वयोवृद्ध महिलांवर पाळत ठेवून लुबाडण्याचे प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सकाळी १० च्या सुमारास सावरकर चौकात राहणारी एक ६५ वर्षीय महिला बाजारात गेली होती. ११ वाजता त्या महिलेने काळा मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर तिघेजण तिच्यावर पाळत ठेवून होते. ही महिला अर्ध्या तासात सावरकर चौकात आली. तेव्हा तिघेही तिचा पाठलाग करत होते. चौकात आल्यानंतर या तिघांनी चौकात इकडे तिकडे फिरायला सुरवात केली. तेव्हा काही नागरिकांनी यातील एकाला हटकले. त्याच वेळी ही वयोवृद्ध महिला तिच्या घराकडे जात होती. तेव्हा दोघेजण महिलेच्या घराच्या कट्ट्याजवळ दुचाकीवर थांबले होते. त्यातील एकाने महिलेला हटकले. घराकडे जाणाऱ्या मार्गावर कोणीही नसल्याचे पाहून त्या भामट्यांनी महिलेला पोलिस असल्याची बतावणी सुरू केली. काय आज्जी तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्ही बातम्या वाचत नाहीत का? तुम्ही तुमच्याकडील सोने असे अंगावर घेऊन कशाला फिरतात? चोऱ्या होत आहेत. आम्ही पोलिस आहोत. तुम्ही आंगातील सोने काढून ठेवा. तरीही महिला म्हणाली की, मी माझ्या घराजवळ आहे. घरात गेल्यानंतर काढून ठेवते. तेव्हा त्यांनी आग्रह करीत त्यांच्याकडील सोने पिशवीत काढून ठेवायला सांगितले. तेव्हा हातचलाखीने या भामट्यांनी सात तोळे सोन्याची (दोन पाटल्या, एक आंगठी) पिशवी लंपास केली. त्यानंतर संबंधीत महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान महिला घरात एकटीच राहते. तिचे नातेवाईक बाहेरगावी असल्याचा फायदा या भामट्यांनी घेतला असल्याची चर्चा परिसरात होत आहे. परिसरातील सीसीटीव्ही पाहून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com