esakal | हृदयद्रावक : जिन्यात उतरला वीज प्रवाह, घरातील तिघे जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

   Three killed in electric shock at beed

मुलीला वाचविताना वडील, काकाला धक्का 

हृदयद्रावक : जिन्यात उतरला वीज प्रवाह, घरातील तिघे जागीच ठार

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड  : घराच्या लोखंडी जिन्यामध्ये वीजप्रवाह उतरल्याने धक्का बसून घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १३) शहरात घडली. पहिल्यांदा सातवर्षीय मुलीला विजेचा धक्का बसला. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पिता, तिचे चुलते ठार झाले. श्रेया तुळशीराम वडमारे (वय सात), तुळशीराम वडमारे (३५) व रमेश वडमारे (वय ४५) अशी या दुर्घटनेत
ठार झालेल्यांची नावे आहेत. 

शहरातील गोविंदनगर भागातील तुळशीराम वडमारे यांच्या घरात आतल्या बाजूने लोखंडी जिना आहे. जिन्याच्या वरच्या भागात वीज मीटर आहे. मीटरच्या प्रमुख केबलला सपोर्ट करणारी तार जिन्याला बांधलेली आहे. या तारेतून आज सकाळी जिन्यात वीजप्रवाह उतरला. जिन्याला हात लागल्याने श्रेया वडमारे हिला विजेचा धक्का बसला. तिला वाचविण्यासाठी धाव घेतलेले वडील तुळशीराम वडमारे, तिचे चुलते रमेश वडमारे यांनाही विजेच्या धक्का बसला. या दुर्घटनेत तिघांनाही जागीच मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप 
 

खाली वाचा बीड जिल्ह्यातील इतर बातम्या

अपघातात दुचाकीस्वार ठार 
गेवराई -
बीडकडून येणाऱ्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना तालुक्यातील वडगाव फाटा येथे सोमवारी (ता. १३) घडली. युवराज रामचंद्र येवले (वय ३५, रा. गोंदी) असे मृताचे नाव आहे. 

येवले हे दुचाकीने (एमएच- २३, एए- १४०२) बीड येथून आपल्या गावी परतत होते. येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गढीजवळील वडगाव फाट्याजवळ पाठीमागून सुसाट वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात जागीच ठार झाले. यानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मृत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 
 
विहिरीत पडल्याने केरूळ येथे महिलेचा मृत्यू 
कडा -
लिंबोडी (ता. आष्टी) येथील महिला केरूळ येथे शेतात खुरपणीसाठी गेली होती. तहान लागल्याने ती पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली असताना पाय घसरून विहिरीत पडली. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी घडली. 

लिंबोडी येथील आशाबाई रमेश आंधळे (वय ३५) ही महिला सोमवारी केरूळ शिवारात असलेल्या शेतात खुरपणी करण्यासाठी गेली होती. दुपारी पाणी आणण्यासाठी जवळील विहिरीवर गेली असता अचानक पाय घसरून तोल गेल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तिच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे. 
 
सायगाव येथे विवाहितेची आत्महत्या 
अंबाजोगाई -
तालुक्यातील सायगाव येथे एका विवाहितेने पेटवून घेतले. उपचारादरम्यान शनिवारी (ता. ११) सायंकाळी तिचा मृत्यू मृत्यू झाला. सय्यद फिरदोस सय्यद नाजेम अली (वय २८, रा. सायगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या सासरकडील पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. माहेरवरून पैसे आणावेत, यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत
होता, असे तिने मृत्युपूर्व जबाबात सांगितले. त्याआधारे पोलिसांनी पती नाजेम अली सय्यद शेराअली सासरा सय्यद शेरअली सय्यद दादामियाँ, सासू सय्यद जहिरा बेगम सय्यद शेरअली, दीर काजीम अली आणि भावजय तबस्सुम या पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. त्यापैकी पती, सासरा आणि दीर या तिघांना ताब्यात घेतले. 

(संपादन : विकास देशमुख)