बीड हादरले : पारधी कुटुंबातील तिघांची हत्या, पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा

रामदास साबळे
Thursday, 14 May 2020

ही घटना बुधवारी (ता. १३) मध्यरात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी १४ जणांना ताब्या घेतले.  बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार अशी मृतांची नावे आहेत.

केज (जि. बीड) : तालुक्यातील मांगवडगाव शिवारात गावातील एका टोळक्याने शेतीच्या वादातून एका पारधी कुटुंबातील वडिलांसह दोन मुलांची हत्या केली. शिवाय त्यांच्या दुचाकीही हल्लेखोरांनी जाळून टाकल्या. ही घटना बुधवारी (ता. १३) मध्यरात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी १४ जणांना ताब्या घेतले.  बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पवार कुटुंबीयांचा मागील काही वर्षांपासून गावातील एका कुटुंबीयाशी शेतीचा वाद सुरू होता. त्यातूनच बुधवारी मध्यरात्री विरोधी गटाचे ३० ते ३५ जणांच्या टोळक्याने ट्रॅक्टरने येऊन या तिघा बापलेकांचा पाठलाग केला. यात त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवे मारले. या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. 
 
घटना पूर्वनियोजित
हत्याकांडापूर्वी पारधी समाजातील व्यक्तींना पळून जाता येऊ नये, यासाठी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या. ट्रॅक्टरने त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केला. यामुळे ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली
 
पोलिस अधिकारीही घटनास्थळावर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद झोटे यांनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. हल्लेखोरांपैकी पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उरलेल्या हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींनी पळून जाऊ नये, यासाठी एक किलोमीटरचा परिसर पोलिसांनी सिल केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Members of Same family Murdered AT Mangwadgaon dist Beed