औरंगाबाद : अत्याचार, खूनप्रकरणी तिघांची फाशी कायम 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता.

औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांच्या पीठाने गुरुवारी सत्र न्यायालयाचा हा निकाल कायम ठेवला. संतोष विष्णू लोणकर, मंगेश दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रय शंकर शिंदे अशी या नराधमांची नावे आहेत. 22 ऑगस्ट 2014 रोजी ही घटना घडली होती. 

लोणी मावळपासूनच हाकेच्या अंतरावर हनुमंतवाडी वस्ती परिसरात पीडिता राहत होती. शेजारच्या अलकुटी गावात ती शिक्षण घेण्यासाठी जात होती. सायंकाळच्या बसने ती बस स्थानकावर आली आणि वस्तीकडे जात होती. त्या वेळी पाऊस पडत असल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्या वेळी आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिने आरडाओरडा करू नये, तसेच मागे पुरावा राहू नये म्हणून आरोपींनी तिच्या नाकातोंडात चिखल कोंबला. संतोष लोणकरने धारदार स्क्रू-ड्रायव्हर तिच्या कपाळावर, कानाजवळ, छातीवर खुपसले. मंगेश लोणकरने तिच्या डोक्‍यात दगड घालून निर्घृणपणे तिचा खून केला, तर तिसरा आरोपी दत्ता शिंदेने तिचे पाय धरून ठेवले होते. पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

खटला चालविण्यासाठी होते आव्हान 
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलीची मैत्रीण, घटनेपूर्वी आरोपींना मोटारसायकलवरून जाताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व गावातील एका टपरीचालकाची साक्ष, तसेच पोलिसांनी जप्त केलेले पुरावे महत्त्वाचे ठरले. त्याआधारेच न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे हा खटला चालवणे एक आव्हान होते. तसेच आरोपींनी पीडितेच्या जखमांवर चिखल फासल्याने वैद्यकीय पुरावे नष्ट झाले. डीएनए जुळू शकले नाहीत; पण परिस्थितीजन्य पुराव्यांमध्ये मुख्य आरोपी संतोषने पीडितेला अडवल्याचे, तत्पूर्वी तिन्ही आरोपींना एकत्र मोटारसायकलवरून जाताना पाहिल्याचे, गुन्हा केल्यानंतर गावातील टपरीचालकाकडे गुन्ह्याची फुशारकी मारत कबुली दिल्याचे, पीडितेच्या शरीरावरील व आरोपींच्या कपड्यांवरील चिखलाचे नमुने जुळल्याने आरोपींना दोषी ठरवले होते. 

मुद्द्यांची जुळविली साखळी 
औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी या मुद्द्यांची साखळी जुळवत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली. फाशीची शिक्षा कायम करण्याचा अधिकार खंडपीठाला असल्याने तसेच सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध तीनही आरोपींनी अपील दाखल केले होते. सुनावणीअंती खंडपीठाने फाशीची शिक्षा कायम ठेवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three men hanged for torture murder in rape case