तिहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरले

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नशेच्या गोळ्या घेऊन कृत्य 
सूत्रांनी तसेच स्थानिकांनी माहिती दिली की, अमोल याने "बटन टोपन' नावाने परिचित असलेल्या नशाकारक गोळ्यांचे सेवन केले होते. यानंतर त्याने खुनाचा प्रकार केला; परंतु याबाबत अजून वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. 

चौधरी कॉलनीत रक्तपात : तरुणाच्या हल्ल्यात पती-पत्नीसह मुलाचाही निर्घृण खून
औरंगाबाद
 - ओळखीतील तरुणाने एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची गंभीर घटना चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत बुधवारी (ता. 25) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, खून करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलबाई दिनकर बोराडे (वय 50), दिनकर भिगाजी बोराडे (वय 55) आणि भगवान दिनकर बोराडे (वय 26, सर्व रा. चौधरी कॉलनी) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर अमोल भागीनाथ बोरडे (वय 23, रा. चौधरी कॉलनी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मृत भगवान याच्या चौधरी कॉलनीतील घरापासून हाकेच्या अंतरावर अमोल राहतो. भगवान हा अमोलचा वर्गमित्र होता. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. भगवान व त्याचे वडील दिनकर बोराडे मजुरी करीत होते. अमोलही एका कंपनीत कामाला होता; परंतु काही दिवसांपूर्वी अमोलने काम सोडले होते. तेव्हापासून तो पडेल ती कामे करीत होता. बुधवारी रात्री भगवान, त्याची आई कमलबाई आणि वडील दिनकर घरात होते. त्यावेळी अमोल हा भगवानच्या घरासमोर हातात चाकू घेऊन आला. त्याने घरात घुसून कुठलाही विचार न करता सपासप वार केले. यात भगवान, त्याची आई व वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. घरात रक्ताचा सडा पडल्यानंतर अमोल घराबाहेर आला. दरम्यान, खुनाची घटना समजताच पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, मधुकर सावंत, उपनिरीक्षक शेख ताहेर, अमोल देशमुख, सुरेश जारवाल यांच्यासह गुन्हे शाखा व ठाण्याची पथके घटनास्थळी पोचली. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला. 

...अन्‌ तो घरासमोरच उभा होता 
अमोलने तिघांचा निर्घृण खून केला, त्यावेळी पावसाची भुरभुर सुरू होती. पावसामुळे रस्त्यावर कुणीही नव्हते. घरातून बाहेर आला तेव्हा आपण काहीच केले नाही, या आविर्भावात अमोल उभा होता. त्याचा चेहरा घाबरलेला नव्हता आणि खुनानंतर कुठलाही पश्‍चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. अमोल हाकेच्याच अंतरावर राहत असल्याने तो गल्लीतून फरारीही झाला नव्हता. त्याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेत ठाण्यात आणले. यानंतर भगवानची बहीण व भावाला घटनेबाबत विचारपूस करण्यासाठी ठाण्यात नेले. या खुनी हल्ल्यानंतर चौधरी कॉलनी व शहरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

"फॉरेन्सिक'कडून तपासणी 
घटनास्थळी न्यायसहायक व वैद्यक विभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी सील केलेले घर उघडले. त्यानंतर आत रक्ताचे नमुने व इतर बाबी पुराव्यासाठी हस्तगत केल्या. 

त्यांच्यात कधीही भांडण नव्हते! 
स्थानिकांनी सांगितले, की बुधवारचा प्रसंग सोडल्यास अमोल व भगवान यांच्यात कधीही भांडण झाले नव्हते. उलट अमोल नेहमी भगवानच्या घरी येत होता. त्यामुळे हा हल्ला कशातून झाला, हे मात्र अजून स्पष्ट होणे बाकी आहे. तरीही काहींच्या मते, हा प्रकार "घरगुती' संबंधातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three murder in Aurangbad in one family