तिघांचा डोहात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आखाडा बाळापूर/शेवाळा - कवडी (ता. कळमनुरी) येथे डोहात बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू  झाल्याची घटना बुधवारी (ता. एक) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. 

आखाडा बाळापूर/शेवाळा - कवडी (ता. कळमनुरी) येथे डोहात बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू  झाल्याची घटना बुधवारी (ता. एक) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. 

कवडी येथील सुखदेव सुभाष राऊत (वय १५), संभाजी प्रकाश पतंगे (१५), विशाल गंगाधर बनसोडे (१४) हे गावापासून जवळच्या शेवाळा (ता. कळमनुरी) येथील जिल्ह परिषद शाळेत आठवीत आहेत. शाळा सुटल्यानंतर आज दुपारी साडेचारच्या सुमारास ते सायकलवर आपल्या गावाकडे (कवडी) येथे निघाले होते. त्या वेळी गावालगतच्या डोहात हातपाय धुताना सुखदेव राऊतचा पाय घसरला आणि तो डोहात पडला. त्याला वाचविण्यासाठी विशाल बनसोडे पाण्यात गेला. नंतर संभाजी पतंगे यानेही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये तिघेही पाण्यात बुडू लागले. आरडाओरड ऐकताच शेतात काम करणारे दत्तराव नामेदव पतंगे (५०) घटनास्थळी धावले व त्यांनी डोहात उडी मारली. त्यांनी विशाल बनसोडे यास बाहेर काढले. उर्वरित दोघांना वाचविण्यासाठी दत्तराव पतंगे यांनी डोहात उडी मारली असता, सुखदेव राऊत व संभाजी पतंगे यांनी त्यांच्या गळ्याला घट्ट मिठ्ठी मारली. त्यामुळे पतंगे यांना बाहेर येणे कठीण झाले. त्यातच तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

कवडीच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आखाडा बाळापूरचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, सहायक निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार संजय मार्के, नागनाथ दीपक, अर्शद पठाण, पंडित बोधनवाड, संतोष नागरगोजे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिस व शेवाळा येथील अविनाश मेंढरे यांनी तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले.

गावावर शोककळा
तिघांचा डोहात मृत्यू झाल्याने कवडी गावावर शोककळा पसरली. सुखदेव राऊत, संभाजी पतंगे हे त्यांच्या घरात एकुलते हाेते. दरम्यान, तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कळमनुरीच्या तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, तलाठी आर. डी. गिरी, प्रेमदास चव्हाण आदींनी रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली.

Web Title: three people death by drown