उस्मानाबादसह तीन तालुके गूढ आवाजामुळे हादरले

File photo
File photo

उस्मानाबाद : भूगर्भातून सोमवारी (ता. 11) दुपारी चार वाजून चौतीस मिनिटांनी झालेल्या गूढ आवाजाने उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा तालुके हादरले. त्यामुळे ग्रामस्थांत काही काळ घबराट पसरली. अनेकजण घराबाहेर पडले. आवाजाचे गूढ उकलले नाही; पण तो कसला, हे विचारण्यासाठी ग्रामस्थ एकमेकांशी संपर्क साधत होते.

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांत 30 सप्टेंबर 1993 ला झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले. गूढ आवाजाबद्दल लातूर येथील भूकंपमापक केंद्रातील अधिकारी अभिजित बोरडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, भूकंप झाल्याची नोंद झाली नसल्याचे ते म्हणाले. 

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. ते नेमके कशाचे, याचा उलगडा झालेला नाही. या आवाजांमुळे घरांवरील पत्रे, दारे, खिडक्‍यांची तावदाने हादरतात, फडताळ्यावरील भांडी पडतात, पत्र्यांच्या घरांत अधिक तीव्रता जाणवते, असा अनुभव जिल्हावासीयांना अनेकदा आला आहे. आजही दुपारी तो आला.

उस्मानाबाद तालुक्‍यातील येडशी, बेंबळी व परिसरातील बेंबळी, आंबेवाडी, विठ्ठलवाडी, महादेवावडी, शिवाजीनगर, रुईभर, केशेगाव, पंचमहाल, उमरेगव्हाण, केशेगाव, बामणी, वाडीबामणी, बरमगाव आदी गांवात तीन ते चार सेकंद हा आवाज जाणवला. बेंबळीत सोमवारी आठवडे बाजार असतो. तेथेही काही काळ घबराटीचे वातावरण होते. तुळजापूर तालुक्‍यातील अणदूर, सिंदफळसह अन्य काही गावांत जमिनीतून गूढ आवाज आल्यामुळे अनेक ग्रामस्थ घराबाहेर पडले. एकमेकांशी संपर्क साधून माहिती व खुशालीबाबत विचारणा केली. 

स्फोटसदृश आवाज 
लोहारा : 1993 च्या भूकंपानंतर लोहारा तालुका भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यात आता गूढ आवाजाची भर पडली. लोहारा शहरासह तालुक्‍यात जमिनीतून स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. त्यामुळे घरांवरील पत्रे हादरले. तालुक्‍यातील सास्तूर, माकणी, होळी, उदतपूर, सालेगाव, तोरंबा, हराळी, रेबेचिंचोली, एकोंडी, कोंडजीगड, धानुरी, जेवळी, आष्टाकासार, कास्ती, नागूर, भातागळी, कानेगाव, मार्डी, वडगाव, वाडीवडगाव, माळेगाव, भोसगा, हिप्परगा, नागराळ, उंडरगाव, लोहारा आदी गावांत आवाज जाणवला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com