चोरट्यांनी पोखर्णीला पोखरले! 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 23 जुलै 2019

- चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामिण भागाकडे वळविला असून एकाच रात्री पोखर्णी (ता. कंधार) येथे तीन घरफोडी करून चार लाखाचा ऐवज लंपास केला.

- या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) रात्री घडली. 

नांदेड : चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामिण भागाकडे वळविला असून एकाच रात्री पोखर्णी (ता. कंधार) येथे तीन घरफोडी करून चार लाखाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) रात्री घडली. 

नांदेड शहरात विविध भागात घरफोडीचे सत्र सुरू असतांनाच आता चोरटे ग्रामिण भागात जावून घरफोडी करत आहेत. कंधार तालुक्यातील पोखर्णी या गावात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी संग्राम चाटे यांच्यासह गोविंद केंद्रे आणि भारतबाई केंद्रे यांचे घर फोडले.

मंगळवारी सकाळी या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर कंधार पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी संग्राम चाटे यांच्या घरातून पंच्याहत्तर हजाराचे सोन्या- चांदीचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये. तर गोविंद केंद्रे यांच्या घरातून सोन्या- चांदीचे दागिने आणि बावन्न हजार रुपये नगदी आणि भारतबाई केंद्रे यांच्या चॅनलगेट कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आणि चोरट्यांनी सोन्या- चादींचे दागिने आणि सत्रा हजार रुपये असा तीन्ही घरातून तीन लाख एक्क्याऐंशी हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केला.

एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याने पोखर्णी चोरट्यांनी पोखरल्याची चर्चा सुरू आहे. संग्राम केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मुलानी हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three thefts observed in one night at pokharni